इराण–अमेरिका युद्धजन्य परिस्थितीचा बारामतीला फटका; व्यावसायिक गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत
२५० हॉटेल्स, ६० मिठाईची दुकाने आणि जवळपास १०० बार व इतर खाद्य व्यवसाय आहेत

इराण–अमेरिका युद्धजन्य परिस्थितीचा बारामतीला फटका; व्यावसायिक गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत
२५० हॉटेल्स, ६० मिठाईची दुकाने आणि जवळपास १०० बार व इतर खाद्य व्यवसाय आहेत
बारामती वार्तापत्र
इराण आणि अमेरिकेमधील वाढलेल्या तणावपूर्ण व युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागला असून बारामती शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे.
या टंचाईमुळे शहरातील हॉटेल, मिठाई दुकाने आणि बार व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. परिस्थिती गंभीर होत चालल्याने बारामती व्यापारी महासंघ आणि हॉटेल व्यावसायिकांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.
बारामती शहरात सुमारे २५० हॉटेल्स, ६० मिठाईची दुकाने आणि जवळपास १०० बार व इतर खाद्य व्यवसाय आहेत. या सर्व व्यवसायांसाठी व्यावसायिक गॅस सिलिंडर हा अत्यावश्यक घटक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक ठिकाणी स्वयंपाकाचे काम ठप्प होण्याची वेळ आली आहे.
परिणामी अनेक व्यावसायिकांपुढे व्यवसाय सुरू ठेवणे कठीण झाले आहे.
व्यापारी महासंघाच्या म्हणण्यानुसार, शहरातील सुमारे ४०० पेक्षा अधिक व्यावसायिक या टंचाईमुळे थेट प्रभावित झाले आहेत. अनेक हॉटेल व्यावसायिकांकडे केवळ एक-दोन दिवसांचा गॅस साठा शिल्लक असून, पुरवठा नियमित झाला नाही तर व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊ शकते.
याबाबत व्यापारी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “जर दर एक दिवसाआड व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा झाला नाही, तर येत्या आठवड्यात बारामतीतील सर्व हॉटेल्स व मिठाई दुकाने बंद ठेवावी लागतील.” अशा परिस्थितीत या व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा नियमित व प्राधान्याने पुरवठा करण्यासाठी तेल कंपन्या आणि संबंधित विभागांशी समन्वय साधावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यापाऱ्यांचे निवेदन स्वीकारून संबंधित विभागाशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याची माहिती व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
गॅस टंचाईचा प्रश्न तातडीने सुटला नाही तर बारामतीतील खाद्य व्यवसाय ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात असून याचा परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतो.






