बारामती तालुक्यात खळबळ! कंत्राटदार दिलीप उर्फ ‘डीडी’ जगताप यांच्यावर प्राणघातक हल्ला;पाच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
नेमका वाद कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

बारामती तालुक्यात खळबळ! कंत्राटदार दिलीप उर्फ ‘डीडी’ जगताप यांच्यावर प्राणघातक हल्ला;पाच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
नेमका वाद कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे बुधवारी (दि. 18 मार्च 2026) सकाळी घडलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कंत्राटदार व शेतकरी दिलीप धनसिंग जगताप (वय 52) उर्फ ‘डीडी’ जगताप यांच्यावर पाच अज्ञात इसमांनी जीव घेण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 18 मार्च रोजी सकाळी अंदाजे 10.55 वाजण्याच्या सुमारास माळेगाव बुद्रुक गावातील बास्केट बाजारसमोरील मोकळ्या जागेत ही घटना घडली. त्या ठिकाणी आलेल्या 25 ते 30 वयोगटातील पाच अज्ञात इसमांनी संगनमत करून जगताप यांना अडवले.
“आमचे पैसे देत नाही का?” असा सवाल करत त्यांनी शिवीगाळ केली आणि त्यानंतर अचानक हल्ला चढवला. आरोपींनी हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच दगड आणि लाकडी काठ्यांनी डोक्यावर व शरीरावर जोरदार मारहाण केली. या हल्ल्यात जगताप गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पैशांच्या व्यवहारातून वाद?
या प्रकरणामागे आर्थिक व्यवहारातून वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हल्ल्यादरम्यान “माझ्याकडे कसले पैसे आहेत, मला का मारता?” असे जगताप ओरडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, नेमका वाद कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
गुन्हा दाखल
फिर्यादी दिलीप जगताप यांच्या तक्रारीवरून पाच अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलमे 109(1), 189(2), 190, 191(1)(2)(3), 3(5) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींचा शोध सुरू
हल्लेखोर हे बारामती शहरातील असल्याची चर्चा सुरू असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. “पुन्हा पाहिल्यास ओळखू शकतो,” असे फिर्यादीने सांगितले आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक खटावकर करत असून, बारामती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.






