राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना नेमकं झालं तरी काय?चर्चांना उधाण
दौऱ्यावेळी काही अनेक वर्ष असणारे स्थानिक नगरसेवकही उपस्थित होते

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना नेमकं झालं तरी काय?चर्चांना उधाण
दौऱ्यावेळी काही अनेक वर्ष असणारे स्थानिक नगरसेवकही उपस्थित होते
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात अलीकडेच घडलेल्या टाकीचा स्फोटाच्या घटनेनंतर राजकीय वातावरणही तापल्याचे दिसून येत आहे.साठे नगर परिसरात झालेल्या सिमेंट टाकीचा स्फोटात तीन जण जखमी झाल्याने या घटनेची गंभीर दखल घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर परिसराची पाहणी करण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी दौरा केला. त्यांच्या दौऱ्यावेळी काही अनेक वर्ष असणारे स्थानिक नगरसेवकही उपस्थित होते.मात्र,या भेटीदरम्यान नागरिकांनी थेट आपल्या समस्या आणि नाराजी व्यक्त केल्याने परिस्थिती अधिकच चिघळल्याचे चित्र दिसून आले. नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजना, आपत्कालीन व्यवस्थापन आणि घटनेनंतरची प्रशासनाची कार्यवाही याबाबत नाराजी व्यक्त केली.
या सगळ्या घडामोडींमुळे बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. “नगरसेवकांना नेमकं झालं तरी काय?” असा सवाल सामान्य बारामतीकरांकडून केला जात आहे. काहींच्या मते, अशा गंभीर घटनेनंतर लोकप्रतिनिधींनी अधिक सक्रिय आणि समन्वयपूर्ण भूमिका घेणे अपेक्षित होते.
याशिवाय, या प्रकरणामुळे पक्षांतर्गत समन्वयाचाही मुद्दा पुढे आला आहे. काही राजकीय वर्तुळांत “अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत शिस्त कमी झाली का?” अशी चर्चा रंगू लागली आहे. पूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत अशा प्रकारच्या विसंगती घडत नसत, मात्र आता स्थानिक पातळीवर वेगवेगळे गट तयार होत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन, नियमित तपासणी आणि आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित केली जात आहे.
एकूणच, सिमेंट टाकीच्या स्फोटाच्या घटनेने केवळ सुरक्षेचा प्रश्नच नव्हे तर बारामतीतील राजकीय समन्वय आणि नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पुढील काळात यावर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






