क्राईम रिपोर्ट

अजितदादांच्या बारामतीत मटका बेधडक;पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर सुरू

स्थानिक नागरिकांच्या मते, पूर्वी अशा बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांचा कडक धाक होता.

अजितदादांच्या बारामतीत मटका बेधडक;पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर सुरू

स्थानिक नागरिकांच्या मते, पूर्वी अशा बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांचा कडक धाक होता.

बारामती वार्तापत्र 

अजितदादा पवार यांच्या बारामतीत एकेकाळी शिस्तबद्ध आणि शांत शहर म्हणून ओळख असलेल्या बारामतीत आज बेकायदेशीर मटका व्यवसायाने अक्षरशः थैमान घातल्याचे चित्र समोर येत आहे.

शहराच्या विविध भागांत उघडपणे मटका सुरू असल्याच्या तक्रारी वाढत असून,पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. यामुळे “नेमकं चाललंय तरी काय?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही सोसायट्या, गल्ल्या आणि चौकांमध्ये दिवसाढवळ्या मटक्याच्या छोट्या-छोट्या अड्ड्यांची उभारणी झाली आहे. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार इतक्या उघडपणे सुरू असतानाही संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, पूर्वी अशा बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांचा कडक धाक होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत हा धाक पूर्णपणे नाहीसा झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी, मटका व्यवसायिकांचे मनोबल वाढले असून ते निर्भयपणे आपला कारभार चालवत आहेत.

याचा सर्वाधिक फटका बसतोय तो तरुण पिढीला. सहज पैसे कमावण्याच्या मोहात अनेक युवक या जुगाराच्या विळख्यात अडकत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. यामुळे आर्थिक नुकसान, कुटुंबीयांमध्ये वाद, तसेच गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मटका हा कायद्याने पूर्णपणे बंदी घातलेला प्रकार असतानाही तो इतक्या बिनधास्तपणे सुरू असणे, हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे द्योतक असल्याची टीका होत आहे. “कारवाई का होत नाही? कोणाच्या आशीर्वादाने हे अड्डे सुरू आहेत?” असे थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, संतप्त नागरिकांनी पोलिस प्रशासनाने तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करून मटका अड्ड्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. शहरात पुन्हा कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

एकूणच, बारामतीत वाढत चाललेला मटका व्यवसाय हा केवळ बेकायदेशीरच नाही, तर सामाजिक व्यवस्थेलाही घातक ठरत आहे. प्रशासनाने वेळीच जागे होऊन कठोर कारवाई केली नाही, तर परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Back to top button