क्राईम रिपोर्ट

बारामतीत नक्की चाललय तरी काय अत्याचार, बेकायदेशीर गर्भपात,भिगवण रोडवरील कथित‘स्त्री बीज प्रकारामध्ये राजकीय हस्तशेप

“फलटण कनेक्शन”सोबतच “बदलापूर कनेक्शन”च्याही चर्चांना उधाण

बारामतीत नक्की चाललय तरी काय अत्याचार, बेकायदेशीर गर्भपात,भिगवण रोडवरील कथित‘स्त्री बीज प्रकारामध्ये राजकीय हस्तशेप

“फलटण कनेक्शन”सोबतच “बदलापूर कनेक्शन”च्याही चर्चांना उधाण

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर झालेल्या कथित बेकायदेशीर गर्भपात प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असतानाच, या प्रकरणाचे धागेदोरे आता फलटणपर्यंत पोहोचल्याचे समोर येत आहे. याचवेळी बारामती शहरात भिगवण रोडवरील नामांकित हॉस्पिटल मधील ‘स्त्री बीच’ प्रकरण पुन्हा चर्चेत आल्याने वातावरण अधिकच तापले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्यानंतर ती गर्भवती झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या गर्भपात करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपासादरम्यान फलटण शहरातील अहिल्याबाई होळकर चौक (पृथ्वी चौक) परिसरातील एका खासगी दवाखान्याचे नाव पुढे आले असून, प्राथमिक तपासात डॉ. नरुटे यांनी गर्भपात केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी रवींद्र व्यंकट गार्डी (वय ४८, रा. कोऱ्हाळे खुर्द, ता. बारामती) याच्यावर गंभीर आरोप होते.

मात्र, त्याने वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात कोठडीत असताना आत्महत्या केल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आरोपीच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले असून, तपास यंत्रणांवर सत्य बाहेर आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

दरम्यान,या प्रकरणात वैद्यकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय असून, संबंधित दवाखान्यातील नोंदी, वैद्यकीय कागदपत्रे, सीसीटीव्ही फुटेज आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब तपासले जात आहेत. काही शासकीय डॉक्टरांची नावेही पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने तपासाचा व्याप वाढत आहे.

याच पार्श्वभूमीवर बारामतीतील ‘स्त्री बीच’ आणि कथित बेकायदेशीर गर्भपात प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले आहे. भिगवण रोड परिसरातील एका नामांकित खासगी हॉस्पिटलभोवती संशयाचे सावट निर्माण झाले असून, क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी तेथे अचानक भेट देऊन कागदपत्रांची तपासणी केल्याची चर्चा आहे.

काही संबंधितांना पुढील चौकशीसाठी मुंबईत हजर राहण्यास सांगण्यात आल्याचेही बोलले जात आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये बेकायदेशीर गर्भपात,वैद्यकीय प्रक्रियेत संभाव्य अनियमितता आणि बाहेरील घटकांचा हस्तक्षेप या बाबी समान असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे “फलटण कनेक्शन”सोबतच “बदलापूर कनेक्शन”च्याही चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांमुळे नागरिकांमध्ये भीती, संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान,काही राजकीय पुढाऱ्यांनी हा संपूर्ण प्रकार दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. राजकीय दबावामुळे तपासाची दिशा बदलण्याचा किंवा प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

संबंधित हॉस्पिटलला काही बड्या राजकीय नेत्यांचा आश्रय असल्याचीही चर्चा रंगत आहे. फलटण गर्भपात प्रकरणात या प्रकरणात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आणि आरोग्य विभागाकडून संयुक्त तपास सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे काही महत्त्वाची नावे समोर आली असून, त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

सध्या या दोन्ही प्रकरणांबाबत अधिकृत माहिती मर्यादित असली तरी,पुढील काही दिवसांत मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांकडून निष्पक्ष आणि पारदर्शक तपासाची जोरदार मागणी होत असून, दोषींवर कठोर कारवाई आणि निर्दोषांना न्याय मिळावा,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Back to top button