राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे प्रतिनिधित्व करत असलेल्या इंदापुरात शेतकरी पाणी प्रश्नावरून प्रचंड आक्रमक
१० मे पासून आमरण उपोषण

राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे प्रतिनिधित्व करत असलेल्या इंदापुरात शेतकरी पाणी प्रश्नावरून प्रचंड आक्रमक
१० मे पासून आमरण उपोषण
इंदापूर;प्रतिनिधि
राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे प्रतिनिधित्व करत असलेल्या इंदापूर तालुक्यात पाणी प्रश्न अधिकच तीव्र झाला असून शेतकरी आक्रमक झाले आहेत.शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता पुणे तसेच मुख्य अभियंता पुणे यांना निवेदन देत 10 मे 2026 पासून कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
खरीप हंगामासाठी 21 दिवसांचे आवर्तन मिळाले असले, तरी रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी केवळ 15 दिवसांचे पाणी मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
उन्हाळी आवर्तन किमान 20 दिवसांचे मिळावे,तसेच इंदापूरचे आवर्तन सुरू असताना दौंड, बारामती आणि होळ परिसरातील होणारा पाण्याचा उपसा तात्काळ बंद करून कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.दरम्यान,मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास 10 मे पासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे.तरीही न्याय न मिळाल्यास 11 मे 2026 रोजी कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
“गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून आमची मागणी सुरू आहे. वरच्या तालुक्यांमध्ये पाणी सुरू आहे,मात्र इंदापूर तालुक्यात आलं की 144 कलम लागू केलं जातं.हा अन्याय आम्ही सहन करणार नाही.शासन दरबारी वारंवार चकरा मारून निवेदन दिलं,पण अद्याप न्याय मिळाला नाही.आमची पिकं पाण्याअभावी जळून गेली आहेत.राज्याचे कृषिमंत्री इंदापूर तालुक्याचे असतानाही आम्हाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.पाणी आलं की लाईट बंद केली जाते, हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही.आता उद्रेक होण्याची वेळ आली आहे.गरज पडली तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करू,पाण्यासाठी बलिदान द्यायलाही तयार आहोत” असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
सिनारमास येथे रास्ता रोको आंदोलन
कार्यकारी अभियंता आणि मुख्य अभियंता यांना आम्ही लेखी निवेदन दिलं आहे.10 मे रोजी सकाळी आठ वाजता सिनारमास येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. जर प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर त्याच दिवशी कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. तरीही न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
इंदापूर तालुक्यात खडकवासला कालव्याचं आवर्तन 25 एप्रिलपासून सुरू होणार असल्याचं सांगितलं होतं.मात्र प्रत्यक्षात पाणी सोडलंच गेलं नाही.आज सर्व शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली असून सिनारमास येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.बारामती,दौंड आणि हवेली तालुक्यांत पाणी सुरू आहे.मात्र इंदापूरमध्ये पाणी आलं की मोटारी बंद करण्याचे आदेश दिले जातात आणि शेतकऱ्यांचे पाइप फोडले जातात.
इंदापूरच्या हक्काचं पाणी नेमकं कुठे जातं?
वीज आणि पाणी हे शासनाने शेतकऱ्यांना द्यायलाच हवं. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर मोठी जबाबदारी असतानाही या प्रश्नावर कुठलंच ठोस वक्तव्य होत नाही.शेतकऱ्यांना ऊस लावू नका,बारमाही शेती करू नका असं सांगितलं जातं,पण मग आम्ही जगायचं कसं,असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
खडकवासला कालव्याचं पाणी वेळेत न आल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी दौंड भागात वळवलं जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.इंदापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने सर्वसामान्य शेतकरी भरडला जात आहे. इंदापूरच्या हक्काचं पाणी नेमकं कुठे जात आहे,असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. पाणी आलं की पाइप फोडले जातात, मग शेतकऱ्यांनी करायचं काय,असा संतप्त प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.पाण्याच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींकडून ठोस भूमिका दिसत नसल्याने आता विश्वास ठेवायचा तरी कोणावर अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.






