बारामती नगरपालिकेच्या नगर विकास विभागावर गंभीर आरोप;नगरसेवक सुनील सस्ते यांचे पत्रक चर्चेत
“बारामतीकरांनी जागे व्हा”

बारामती नगरपालिकेच्या नगर विकास विभागावर गंभीर आरोप;नगरसेवक सुनील सस्ते यांचे पत्रक चर्चेत
“बारामतीकरांनी जागे व्हा”
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात पुन्हा एकदा नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नगरसेवक सुनील सस्ते यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकामुळे नगर विकास विभागाचा कारभार चर्चेचा विषय ठरला आहे. “जनतेच्या सेवेसाठी की काहींच्या फायद्यासाठी?” असा थेट सवाल करत या पत्रकातून नगरपालिकेच्या टीपी (टाउन प्लॅनिंग) विभागातील अनेक कथित गैरप्रकार समोर आणण्यात आले आहेत.
पत्रकात करण्यात आलेल्या आरोपांनुसार नगर विकास विभागातील कामे बीपीएमएस प्रणालीद्वारे सुरू असली तरी प्रत्यक्षात ‘मीटर पडल्याशिवाय’ कोणतीही फाईल पुढे सरकत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक फाईली एका टेबलवर तब्बल दीड महिना म्हणजेच ४७ दिवसांपर्यंत पडून राहत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य नागरिक, बांधकाम व्यावसायिक आणि मालमत्ता धारक यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले आहे.
याचबरोबर हा विभाग पूर्णपणे तांत्रिक स्वरूपाचा असून बांधकाम क्षेत्रातील ज्ञान असलेल्या अधिकाऱ्यांकडेच त्याचा कारभार असणे अपेक्षित असल्याचे पत्रकात म्हटले आहे. मात्र काही राजकीय आणि आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहीचे अधिकारही काही ठराविक व्यक्तींकडे दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
नगर विकास विभागात आर्किटेक्ट संबंधित कामेच प्राधान्याने केली जात असल्याचा दावा करत सर्वसामान्य नागरिकांची कामे मात्र प्रलंबित ठेवली जात असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. विभागातील काही लिपिक गेली २०-२० वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असून त्यांची बदली होत नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. काही कर्मचाऱ्यांना “आयफोन सर” अशी ओळख असल्याचा उल्लेख करत आर्थिक व्यवहारांबाबत अप्रत्यक्ष टोला लगावण्यात आला आहे.
विशेष म्हणजे विभागातील काही व्यवहार कार्यालयीन वेळेनंतर सुरू होत असल्याचा धक्कादायक आरोपही करण्यात आला आहे. संध्याकाळी कार्यालयीन स्टाफ गेल्यानंतर अभियंते आणि संबंधित व्यक्ती पंचतारांकित हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी बैठक घेत असल्याचा उल्लेख पत्रकात करण्यात आला आहे.
पत्रकात बारामती नगरपालिकेतील अधिकृत टाउन प्लॅनर नसल्याचाही मुद्दा मांडण्यात आला आहे. यापूर्वी एका नगररचनाकाराला विभागीय चौकशीचा सामना करावा लागला होता, मात्र त्यानंतरही सुधारणा झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जमिनीवरील आरक्षण टाकण्याच्या प्रक्रियेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. काही जमीनमालकांच्या जागेवर हेतुपुरस्सर आरक्षण टाकले जाते का? आरक्षण टाकताना संबंधित सदस्य बैठकीला उपस्थित होते का? याची चौकशी करण्याची मागणी पत्रकातून करण्यात आली आहे.
याशिवाय स्वर्गीय अजितदादांच्या नावाखाली काही “मलिदा गँग” कार्यरत असल्याचा उल्लेख करत काही लोक त्यांच्या नावाचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि नागरिकांनी आपल्या मालमत्तेवरील आरक्षणांची तपासणी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
“बारामतीकरांनी जागे व्हा” असे आवाहन करत नागरिकांनी आपल्या जमिनीवरील आरक्षण, बिल्डिंग परवानग्या आणि बैठकीतील उपस्थिती यांची माहिती तपासावी, अन्याय सहन करू नये आणि आवाज उठवावा असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या पत्रकामुळे बारामतीच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून नगरपालिकेकडून किंवा संबंधित विभागाकडून यावर काय भूमिका घेतली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






