शैक्षणिक

पेपरफोड प्रकरण शांत होत नाही तोच मोटेगावकरचा नवा Video; विद्यार्थ्यांना आमिष दाखवल्याची चर्चा

एक खास चित्रफित समाज माध्यमांवर फिरत आहे.

पेपरफोड प्रकरण शांत होत नाही तोच मोटेगावकरचा नवा Video; विद्यार्थ्यांना आमिष दाखवल्याची चर्चा

एक खास चित्रफित समाज माध्यमांवर फिरत आहे.

बारामती वार्तापत्र

नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील प्रसिद्ध शिकवणी संस्था ‘आरसीसी’चे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली. दिल्लीच्या विशेष न्यायालयाने त्यांना ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

मोटेगावकर यांचा नीट पेपरफुटीतील सक्रीय सहभाग असल्याचे पुरावे सीबीआयला थेट मोटेगावकर यांच्या घरातूनच मिळाले आहेत. तत्पूर्वी अटकेआधी पेपर फोडल्यानंतरही विद्यार्थी आणि पालक पुन्हा गळाला लावण्यासाठी मोटेगावकर पुढच्या तयारीलाही लागला होता.

सीबीआय अटकेनंतर शिवराज मोटेगावकर याचे अनेक चित्रफिती समाज माध्यमांवर वेगाने पसरत आहेत. त्याची शिकवणीची पद्धती, विद्यार्थी-पालकांना भुरळ घालणारी भाषा, नीटचे युद्ध जिंकण्यासाठी संघर्षाची भाषा बोलून स्वप्ने विकण्याची त्याची खास शैली यासंदर्भातील एक खास चित्रफित समाज माध्यमांवर फिरत आहे.

NEET पेपर फोडून शिवराज मोटेगावकर पुढच्या तयारीलाही लागला होता!

पेपरफुटीमुळे रद्द झालेली नीट परीक्षा २१ जून रोजी पुन्हा होत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नवी तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार शिवराज मोटेगावकर याने पुन्हा कंबर कसून नीटच्या पुनर्परीक्षेसाठी मार्गदर्शन व्याख्यान आणि प्रश्नसंच मोफत देण्याची तयारी दाखवली आहे. याच अनुषंगाने त्याने समाज माध्यमांवर प्रसिद्ध केलेली चित्रफित त्याच्या अटकेनंतर व्हायरल होत आहे.

या चित्रफितीत विद्यार्थी आणि पालकांना नीटचे युद्ध जिंकण्यासाठी तो प्रेरित करीत आहे. विद्यार्थ्यांनो तुम्हाला डॉक्टर व्हायचंय आणि तुमच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे तर संघर्षाची तयारी ठेवा. १२ हजार प्रश्न सोडविल्यानंतर कुणीही नीट पास होऊ शकतो, असे मानले जाते. परंतु आरसीसी केंद्र तुमच्याकडून ३६ हजार प्रश्न सोडवून घेत आहे. त्यामुळे तुम्हाला डॉक्टर बनण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असे मोटेगावकर संबंधित चित्रफितीतून सांगत आहे.
विद्यार्थी-पालकांना आपल्या क्लासकडे आकर्षित करण्यासाठी ‘रिशेड्युल’

विशेष म्हणजे याआधी पार पडलेल्या नीट परीक्षेचा पेपर त्याच्याकडे आधीच आला होता. परीक्षेच्या आधी जवळपास १० दिवस त्याच्याकडे संपूर्ण प्रश्नपत्रिका होती. आधी गुन्हा केलेला असतानाही दुसऱ्यांदा त्याने विद्यार्थी-पालकांना आपल्या क्लासकडे आकर्षित करण्यासाठी नव्या बॅचची तयारी केली होती. त्यासाठी अंगात १० हत्तींचं बळ आणून ‘कष्ट-संघर्ष-युद्ध’ असे शब्दप्रयोग करून त्याला आई वडिलांच्या स्वप्नांची झालर चढवून विद्यार्थ्यांनी क्लासला प्रवेश घेतलाच पाहिजे, असे भाषण ठोकले. पण त्याची नवी बॅच सुरू होण्याआधीच त्याला सीबीआयने उचलला.

NEET पेपरफुटी प्रकरणात ‘मोटेगावकरचा सरांचा’ रोल काय?

नीट परीक्षा झाल्यानंतर मोटेगावकर सरांनी त्यांच्या एका विद्यार्थिनीबरोबर एक चित्रफित (व्हिडीओ) रेकॉर्ड केली. पेपरमध्ये आलेले प्रश्न आपल्या क्लासमध्ये कसे आधीच शिकवले गेले होते, त्या विषयासंबंधी आपल्या क्लासने कशी विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली होती, असा चित्रफितीचा आशय होता. याच चित्रफितीवरून सीबीआयला संशय आला. तसेच सीबीआयने ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या चौकशीत शिवराज मोटेगावकर याचेही नाव आले. त्यावेळी सीबीआयने लातूरात धाड टाकून शिवराज मोटेगावकर याच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल आणि नीट संबंधित प्रश्नपत्रिका जप्त केली. त्याच्या मोबाईलमध्ये काही संशयित चॅट आणि संपर्क केलेले नंबर सापडल्याने सीबीआयचा संशय खरा ठरला. ज्यावेळी प्रा. पी व्ही कुलकर्णी याची चौकशी केली तेव्हा त्याने मोटेगावकर याचेही नाव घेतले. त्यामुळे मोटेगावकर सीबीआयच्या रडारवर आला. कुलकर्णी याच्याकडून पेपर घेऊन तो विद्यार्थ्यांना दिल्याचा आरोप मोटेगावकर याच्यावर आहे.

Back to top button