राजकीय

बारामतीचा दादा कोण?रोहित पवार यांनी बारामतीत घेतला जनता दरबार

जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांशी थेट संपर्क

बारामतीचा दादा कोण?रोहित पवार यांनी बारामतीत घेतला जनता दरबार

जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांशी थेट संपर्क

बारामती वार्तापत्र

बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट)ाचे आमदार रोहित पवार यांनी बारामतीत आयोजित केलेल्या ‘जनता दरबारा’मुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे रोहित पवार गेल्या काही महिन्यांपासून बारामतीत सातत्याने सक्रिय दिसत असून, त्यांच्या वाढत्या हालचालींकडे आगामी 2029 विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

बारामतीमधील शारदानगर येथील आप्पासाहेब पवार सभागृहात आज दुपारी आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारात नागरिकांच्या विविध समस्या, स्थानिक प्रश्न आणि विकासकामांबाबत थेट संवाद साधण्यात आला. बारामतीकरांशी प्रत्यक्ष संपर्क वाढवण्याचा आणि स्थानिक पातळीवर स्वतःची वेगळी राजकीय ओळख मजबूत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बारामती हा अनेक दशकांपासून अजित पवार यांचा प्रभावक्षेत्र मानला जातो. पवार कुटुंबाचे राजकीय वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात आता नव्या नेतृत्वाच्या चर्चांना वेग आला आहे. विशेष म्हणजे, रोहित पवार यांनी अलीकडेच 2029 च्या विधानसभा निवडणुकीबाबत सूचक विधान करत भविष्यात बारामतीत पवार कुटुंबातील सदस्यांमध्येच राजकीय सामना होऊ शकतो, असे संकेत दिले होते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे आता राजकीय विश्लेषक आणि कार्यकर्त्यांचे विशेष लक्ष लागले आहे.

‘रोहित दादा’ म्हणून युवा कार्यकर्त्यांमध्ये ओळख निर्माण करणारे रोहित पवार हे बारामतीत सातत्याने भेटीगाठी, संवाद कार्यक्रम आणि संघटनात्मक हालचाली वाढवत असल्याचे दिसत आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांशी थेट संपर्क साधत स्थानिक पातळीवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, बारामतीच्या राजकारणात “पुढचा दादा कोण?” हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. एकीकडे पारंपरिक पवार कुटुंबीयांचे वर्चस्व, तर दुसरीकडे नव्या पिढीचे नेतृत्व पुढे येण्याचे संकेत यामुळे आगामी काळात बारामतीतील राजकारण अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, आजचा जनता दरबार हा केवळ नागरिकांच्या समस्या ऐकण्यापुरता मर्यादित नसून भविष्यातील मोठ्या राजकीय मोर्चेबांधणीचा भाग असू शकतो. त्यामुळे 2029 च्या निवडणुकांची बीजे आतापासूनच रोवली जात आहेत का, याची चर्चा आता बारामतीच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

Back to top button