बारामतीतील नामांकित इलेक्ट्रिक दुचाकी शोरूमवर ग्राहकांची नाराजी; वारंवार तांत्रिक बिघाडाचे आरोप
काही ग्राहकांनी वारंवार बिघाड, सेवा विलंब आणि तांत्रिक समस्यांबाबत ऑनलाईन तक्रारी नोंदवल्या आहेत.

बारामतीतील नामांकित इलेक्ट्रिक दुचाकी शोरूमवर ग्राहकांची नाराजी; वारंवार तांत्रिक बिघाडाचे आरोप
काही ग्राहकांनी वारंवार बिघाड, सेवा विलंब आणि तांत्रिक समस्यांबाबत ऑनलाईन तक्रारी नोंदवल्या आहेत.
बारामती वार्तापत्र
देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पर्यावरणपूरक वाहनांचा वापर वाढवण्याचे आवाहन केले असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीसह अनेक शहरांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झपाट्याने वाढली आहे. मात्र वाहन विक्रीसोबतच आता सेवा आणि तांत्रिक अडचणींचे प्रश्नही समोर येऊ लागले आहेत.
बारामतीतील एका नामांकित एथर शोरूमबाबत काही नागरिकांनी गंभीर नाराजी व्यक्त केली आहे. आकर्षक ऑफर्स, आधुनिक फीचर्स आणि कमी खर्चात प्रवासाचे आश्वासन देत ग्राहकांना वाहन खरेदीसाठी प्रोत्साहित केले जाते. मात्र वाहन खरेदी केल्यानंतर वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, संबंधित ग्राहकांनी वर्षभरात अनेक वेळा तक्रारी करूनही समस्या पूर्णपणे दूर होत नसल्याचा दावा केला आहे.
एका ग्राहकाने सांगितले की, गेल्या दोन महिन्यांत चार वेळा गाडी शोरूममध्ये दुरुस्तीसाठी द्यावी लागली, तरीही मूळ समस्या कायम आहे.
वाहनामध्ये तांत्रिक दोष असल्याने रोजच्या वापरात अडचणी निर्माण होत असून नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात शोरूम मॅनेजर, वर्कशॉप मॅनेजर तसेच संबंधित मालकांनाही वेबसाईट आणि इतर माध्यमांतून माहिती देण्यात आली, मात्र समाधानकारक तोडगा निघालेला नाही, अशी तक्रार ग्राहकांनी केली आहे.
दरम्यान, देशभरात काही इलेक्ट्रिक वाहन ग्राहकांनी सेवा आणि दुरुस्तीबाबत नाराजी व्यक्त केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही ग्राहकांनी वारंवार बिघाड, सेवा विलंब आणि तांत्रिक समस्यांबाबत ऑनलाईन तक्रारी नोंदवल्या आहेत.
बारामतीमध्ये विविध नामांकित कंपन्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी उपलब्ध आहेत. मात्र केवळ आकर्षक जाहिरातींवर विश्वास ठेवण्यापेक्षा ग्राहकांनी वाहनाची सेवा व्यवस्था, स्पेअर पार्ट्स उपलब्धता आणि विक्रीनंतरचा प्रतिसाद याची खातरजमा करूनच निर्णय घ्यावा, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत असताना कंपन्यांनी केवळ विक्रीवर भर न देता ग्राहकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करणे आवश्यक असल्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे. अन्यथा वाढत्या ईव्ही बाजारपेठेबाबत ग्राहकांच्या मनात अविश्वास निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






