क्राईम रिपोर्ट

गर्भपात रॅकेटविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई;वाघोलीच्या डॉक्टरला अटक

रॅकेटचे जाळे अधिक मजबूत होत गेल्याचे बोलले जात आहे.

गर्भपात रॅकेटविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई;वाघोलीच्या डॉक्टरला अटक

रॅकेटचे जाळे अधिक मजबूत होत गेल्याचे बोलले जात आहे.

बारामती वार्तापत्र 

दौंड तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंगनिदान आणि गर्भपात रॅकेटविरोधात यवत पोलिसांनी मोठी कारवाई करीत वाघोली येथील एका डॉक्टरला अटक केली आहे.

या प्रकरणामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या रॅकेटमध्ये आणखी काही डॉक्टर आणि दलालांचा सहभाग असण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.

याबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गर्भलिंगनिदान चाचणी प्रकरणात अण्णासाहेब गिरी याला अटक करण्यात आली होती. दौंड न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. यादरम्यान यवत पोलिसांनी तांत्रिक माहिती, संपर्क आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू ठेवली होती. तपासादरम्यान रविवारी रात्री वाघोली येथील डॉक्टर अतुल अंकुश जाधव याला अटक करण्यात आली.

सोमवारी अण्णासाहेब गिरी आणि डॉ. जाधव या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही पुढील पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे, गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असतानाही काही ठिकाणी गुप्त पद्धतीने चाचण्या आणि त्यानंतर बेकायदेशीर गर्भपात होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या होत्या. मात्र, ठोस कारवाई अभावानेच होत असल्याने या रॅकेटचे जाळे अधिक मजबूत होत गेल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे आरोग्य विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. आगामी काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तविली आहे.

संपूर्ण साखळी होणार उघड

यवत पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तपासात काही वैद्यकीय व्यावसायिक, मध्यस्थ आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पाच वर्षांपासून सुरू होता अवैध व्यवसाय?

दौंड तालुका तसेच पुणे जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून बेकायदेशीर गर्भलिंगनिदान आणि गर्भपाताच्या घटना सातत्याने घडत असल्याची चर्चा आता पुन्हा जोर धरू लागली आहे. या गंभीर प्रकारांकडे आरोग्य विभागाने वेळोवेळी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे अशा टोळ्यांना अभय मिळाले आणि त्यांनी कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.

Back to top button