पावसाचं गारपिटीचा फटका;बांधावर जात युगेंद्र पवारांचा सरकारला इशारा
सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही म्हणून लवकरच आम्ही आंदोलन करणार

बारामतीच्या पश्चिम पट्ट्याला अवकाळी पावसाचं गारपिटीचा फटका;बांधावर जात युगेंद्र पवारांचा सरकारला इशारा
सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही म्हणून लवकरच आम्ही आंदोलन करणार
बारामती वार्तापत्र
सध्या राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. काही भागात उन्हाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे, तर काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे. दरम्यान, बारामती तालुक्यात देखील अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे.
याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. फळबागांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याच नुकसानग्रस्त भागाची पाहणी शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी केली. सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देत नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळं लवकरच आम्ही आंदोलन करणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितलं.
भाजीपाला पिकांसह फळबागा जमिनीवर आडव्या
बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठा तडाखा दिला आहे. होळ, सदोबाचीवाडी, वडगाव निंबाळकर, निंबूतसह परिसरातील गावांमध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भाजीपाला पिकांसह फळबागा जमिनीवर आडव्या झाल्यात.
यानंतर शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी होळ, सदोबाचीवाडी, वडगाव बुद्रुक यासह इतर परिसरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या नुकसानीची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधत युगेंद्र पवार यांनी एकूणच परिस्थितीचा आढावा घेतला. सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही म्हणून लवकरच आम्ही आंदोलन करणार असल्याचे देखील युगेंद्र पवारांनी सांगितलं.
परभणी जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर विविध भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
परभणी जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर विविध भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला, तर काही भागांत गारपीटही झाली आहे.अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर शेतकरी वर्गात पिकांच्या नुकसानीची चिंता व्यक्त होत आहे.गंगाखेड तालुक्यातील तांदुळवाडी गावात गारपीठ ही झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव व भडगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव व भडगाव तालुक्यात अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सायंकाळी काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच पावसाने जोर धरल्याने रस्त्यांवर पाणी साचले तर वाहनचालक आणि नागरिकांची धावपळ उडाली. दरम्यान, भडगाव तालुक्यातील गुढे, आडळसे व जुवार्डी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याची माहिती समोर आली आहे.
अचानक झालेल्या या हवामान बदलामुळे ग्रामीण भागातही मोठा परिणाम दिसून आला असून गारपिटीमुळे पिकांच्या नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज झालेल्या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून असलेल्या उकाड्यात काही प्रमाणात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही भागात ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.






