आपला जिल्हा

“शहा ग्लोबल स्कूलच्या” विद्यार्थ्यांची जलशुद्धीकरण केंद्रला शैक्षणिक क्षेत्रभेट;पाणी शुद्धीकरण प्रक्रियेचे घेतले प्रत्यक्ष ज्ञान

विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर सामाजिक जबाबदारीची जाणीव..

“शहा ग्लोबल स्कूलच्या” विद्यार्थ्यांची जलशुद्धीकरण केंद्रला शैक्षणिक क्षेत्रभेट;पाणी शुद्धीकरण प्रक्रियेचे घेतले प्रत्यक्ष ज्ञान

विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर सामाजिक जबाबदारीची जाणीव..

इंदापूर,आदित्य बोराटे – 

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण जागरूकता आणि जीवनावश्यक संसाधनांविषयी सखोल समज निर्माण करण्याच्या उद्देशाने शहा ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतीच इंदापूर येथील जलशुद्धीकरण केंद्राला शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. या क्षेत्रभेटीद्वारे विद्यार्थ्यांना पिण्याचे स्वच्छ आणि सुरक्षित पाणी नागरिकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचते, याची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली.

क्षेत्रभेटीदरम्यान जलशुद्धीकरण केंद्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक विजयकुमार माळी यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण जलशुद्धीकरण प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी आधुनिक यंत्रसामग्री, विविध प्रक्रिया टप्पे आणि पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रक्रियेचे बारकाईने निरीक्षण करत विविध प्रश्न विचारून आपली जिज्ञासा व्यक्त केली.

यावेळी मार्गदर्शन करताना माळी म्हणाले की, उजनी धरणातून आणलेले कच्चे पाणी सर्वप्रथम जॅकवेलद्वारे जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. त्यानंतर इरिगेशन फाउंटनच्या माध्यमातून पाण्यात ऑक्सिजन मिसळून त्याची गुणवत्ता सुधारली जाते. पुढील टप्प्यात क्लॅरिफ्लॉक्युलेटरमध्ये रासायनिक प्रक्रियेच्या सहाय्याने पाण्यातील अशुद्धी, गाळ व निलंबित कण वेगळे केले जातात. त्यानंतर पाणी फिल्टर बेडमधून गाळून अधिक स्वच्छ केले जाते. फिल्ट्रेशननंतर प्रयोगशाळेत पाण्याची गुणवत्ता तपासली जाते आणि सर्व निकष पूर्ण झाल्यानंतर शुद्ध पाणी पंप हाऊसच्या माध्यमातून शहर व परिसरातील विविध भागांत वितरित केले जाते.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व, जलस्रोतांचे संवर्धन, पाणी वाचविण्याची गरज तसेच सार्वजनिक आरोग्यामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची भूमिका याविषयीही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रक्रिया पाहिल्यामुळे त्यांच्या पाठ्यपुस्तकातील संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या आणि विज्ञान विषयाबद्दलची आवड अधिक वृद्धिंगत झाली.

क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर सामाजिक जबाबदारीची जाणीवही निर्माण झाली. भविष्यात जलसंधारण, पाणी व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या विषयांमध्ये अधिक रस निर्माण होण्यासाठी अशा उपक्रमांचा मोठा फायदा होतो, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांनी या अनुभवाबद्दल उत्साह व्यक्त करत जलशुद्धीकरण केंद्रातील विविध प्रक्रिया जवळून पाहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल शाळेच्या वतीने विजयकुमार माळी यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

या शैक्षणिक क्षेत्रभेटीस शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अनुभवाधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी शहा ग्लोबल स्कूल अशा नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त शैक्षणिक उपक्रमांचे नियमित आयोजन करत असते.

Back to top button