शैक्षणिक

बारामती नगरपरिषदेच्या १७ शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात ढोल-ताशा, लेझीम, पाठ्यपुस्तक व खाऊ वाटपातून विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवत त्यांना प्रोत्साहन दिले

बारामती नगरपरिषदेच्या १७ शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात ढोल-ताशा, लेझीम, पाठ्यपुस्तक व खाऊ वाटपातून विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवत त्यांना प्रोत्साहन दिले

बारामती वार्तापत्र 

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवशी बारामती नगरपरिषदेच्या सर्व १७ शाळांमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथकांचे सादरीकरण, विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पवर्षाव आणि विविध स्वागत उपक्रमांच्या माध्यमातून नवागत तसेच जुन्या विद्यार्थ्यांचे आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले.

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी, शाळेविषयी आत्मीयता वाढावी आणि त्यांच्या आयुष्यातील हा दिवस संस्मरणीय ठरावा या उद्देशाने नगरपरिषदेच्या शिक्षण विभागाने विशेष नियोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, पेन्सिल, शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.

नगरपरिषदेच्या प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे हाताचे व पायाचे ठसे घेऊन स्मृतीफलक तयार करण्यात आले, तर काही ठिकाणी आकर्षक सजावट, स्वागत कमानी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात शाळेबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली.

शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. या क्षणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि लोकप्रतिनिधी यांनी विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवत त्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्यासोबत हास्यकल्लोळ, संवाद आणि विविध उपक्रमांमधून नव्या शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात करण्यात आली.

या प्रवेशोत्सव कार्यक्रमाला नगराध्यक्ष सचिन शेठ सातव, उपनगराध्यक्षा तथा शिक्षण समिती सभापती श्वेता ताई नाळे, शिक्षण विभाग प्रमुख जुई पवार, माजी प्राचार्य मुरूमकर सर, नगरसेवक तथा प्रतोत विशाल हिंगणे, नगरसेवक सोमनाथ गजाकस, गणेश जोजारे, गोरख पारसे, अल्ताफ सय्यद, अमर धुमाळ, अविनाश निकाळजे, शर्मिलाताई ढवण, सविताताई जाधव, धनश्रीताई बांदल, सारिकाताई वाघमारे तसेच क्रीडा शिक्षक गावडे सर, पाटील सर, नवनाथ मलगुंडे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट – १
स्वर्गीय अजितदादा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या विकासदृष्टीतून शिक्षणाला प्राधान्य.
“बारामतीच्या विकासाचा पाया शिक्षणामध्ये आहे, ही विचारधारा स्वर्गीय अजितदादांनी रुजविली आणि आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच विकासदृष्टीने शैक्षणिक क्षेत्र अधिक सक्षम करण्याचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि आनंददायी शालेय वातावरण उपलब्ध करून देणे हे बारामती नगर परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रवेशोत्सवासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आपुलकी निर्माण होते आणि शिक्षणाची गोडी वाढते. भविष्यातही नगरपरिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.”
— सचिन सातव, नगराध्यक्ष, बारामती नगर परिषद

चौकट – २
शाळेची गोड सुरुवात विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाविषयी प्रेम निर्माण करते.
“विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात आनंददायी वातावरणात झाली तर त्यांच्यामध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. त्यामुळे प्रवेशोत्सव हा केवळ स्वागताचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या मनात शाळेविषयी जिव्हाळा आणि आत्मीयता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. नगरपरिषदेच्या सर्व शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंदी आणि प्रेरणादायी वातावरण देण्याचे काम करण्यात आले आहे. आगामी काळातही शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.”
– श्वेता नाळे, उपनगराध्यक्षा तथा शिक्षण समिती सभापती, बारामती नगर परिषद

Back to top button