क्राईम रिपोर्ट

जीवाला धोका,रात्र झाली म्हणून तक्रार नको? व्हायरल व्हिडिओने पोलीस यंत्रणेवर प्रश्न”

“दिवसा असती तर कंप्लेंट घेतली असती, आता रात्र झाली आहे,”

जीवाला धोका,रात्र झाली म्हणून तक्रार नको? व्हायरल व्हिडिओने पोलीस यंत्रणेवर प्रश्न”

“दिवसा असती तर कंप्लेंट घेतली असती, आता रात्र झाली आहे,”

इंदापूर : प्रतिनिधि

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस ठाण्यातील एक कथित संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जीवाला धोका असल्याची तक्रार देण्यासाठी मध्यरात्री पोलीस ठाण्यात गेलेल्या एका नागरिकाची तक्रार घेण्यास कथितपणे टाळाटाळ केल्याचा आरोप या व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित नागरिक पोलीस अधिकाऱ्यांना “मला केस करायची आहे” असे सांगताना ऐकू येतो. त्यावर “कुणावर?” अशी विचारणा करण्यात येते. नागरिकाने “गावातील काही लोक जीव मारून टाकण्याची धमकी देत आहेत,” असे सांगितल्यानंतर तक्रार तत्काळ नोंदविण्याऐवजी “आता झाले की बंद आहे, किती वाजलेत?” तसेच “आम्ही दोघेच आहोत इथे” अशा स्वरूपाचे उत्तर दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे.

यावेळी संबंधित नागरिकाने वारंवार “माझी कंप्लेंट घ्या” अशी विनंती केल्याचेही दिसून येते. मात्र “दिवसा असती तर कंप्लेंट घेतली असती, आता रात्र झाली आहे,” असे उत्तर मिळाल्याचा आरोप व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे.

या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा आणि पोलीस ठाण्यांत तक्रार नोंदणी प्रक्रियेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः जीवाला धोका असल्याची बाब सांगितल्यानंतरही तक्रार तत्काळ नोंदविण्यात आली का, संबंधित व्यक्तीला संरक्षण देण्यात आले का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

मात्र या कथित प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, व्हिडिओची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी जोर धरत आहे. आता याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणती भूमिका घेतात आणि संबंधित व्हिडिओबाबत काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button