चार वर्षांनंतर मिळाला न्याय! बारामती तालुका पोलिसांनी फिर्यादीला परत केले ₹४.५० लाखांचे सोन्याचे दागिने
चोरीला गेलेले दागिने तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा हाती आल्याने जाधव कुटुंबाने समाधान व्यक्त केले.

चार वर्षांनंतर मिळाला न्याय! बारामती तालुका पोलिसांनी फिर्यादीला परत केले ₹४.५० लाखांचे सोन्याचे दागिने
चोरीला गेलेले दागिने तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा हाती आल्याने जाधव कुटुंबाने समाधान व्यक्त केले.
बारामती वार्तापत्र
घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना अटक करण्याबरोबरच जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकापर्यंत पोहोचविण्यात बारामती तालुका पोलिसांनी पुन्हा एकदा तत्परता दाखविली आहे. २०२१ मध्ये घडलेल्या घरफोडी प्रकरणातील तब्बल ₹४ लाख ५० हजार किमतीचे पाच तोळे सोन्याचे दागिने न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी (१ ऑगस्ट) मूळ फिर्यादीच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळेगाव बुद्रुक येथील शारदानगर परिसरात राहणारे शेतकरी अरुण लक्ष्मण जाधव यांच्या घरात जून २०२१ मध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास केले होते.
या घटनेनंतर बारामती तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी कसून तपास करत दोन संशयित आरोपींना अटक केली.
त्यांच्या ताब्यातून ३० ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या आणि एक सोन्याचे लॉकेट, असा सुमारे ₹४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार हा मुद्देमाल मूळ फिर्यादी अरुण जाधव यांच्याकडे विधिवत सुपूर्द करण्यात आला.
चोरीला गेलेले दागिने तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा हाती आल्याने जाधव कुटुंबाने समाधान व्यक्त केले. पोलिसांच्या तपासामुळे हरवलेली मौल्यवान संपत्ती परत मिळाल्याने न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
ही संपूर्ण कार्यवाही पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. गुन्ह्यांचा छडा लावण्याबरोबरच जप्त मुद्देमाल योग्य त्या मालकापर्यंत पोहोचविण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.






