क्राईम रिपोर्ट

बारामती शहर पोलिसांची मोठी कामगिरी; म्हसोबा मंदिर चोरीप्रकरणी पाच जणांवर कारवाई

कसून चौकशीत या संशयितांनी चांदीच्या वस्तू इतर तिघांनी विक्रीसाठी दिल्याची कबुली

बारामती शहर पोलिसांची मोठी कामगिरी; म्हसोबा मंदिर चोरीप्रकरणी पाच जणांवर कारवाई

कसून चौकशीत या संशयितांनी चांदीच्या वस्तू इतर तिघांनी विक्रीसाठी दिल्याची कबुली

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरातील तांदुळवाडी रोडवरील कल्पनानगर परिसरातील म्हसोबा मंदिरातून चोरीस गेलेला चांदीचा घोडा आणि चांदीच्या पादुकांचा जोड बारामती शहर पोलिसांनी अवघ्या तपासाच्या जोरावर हस्तगत करत मंदिर चोरीचा यशस्वी छडा लावला आहे. या प्रकरणात चार तरुणांसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

५ जुलैच्या रात्री ते ६ जुलैच्या सकाळदरम्यान अज्ञात चोरट्याने मंदिराचे कुलूप तोडून चांदीचा घोडा आणि पादुकांचा जोड लंपास केला होता. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. तसेच गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू असताना दोन संशयित युवक चांदीच्या वस्तूंनी भरलेली पिशवी घेऊन विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली.

कसून चौकशीत या संशयितांनी चांदीच्या वस्तू इतर तिघांनी विक्रीसाठी दिल्याची कबुली दिली. त्यानंतर आणखी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तपासात एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने म्हसोबा मंदिरातून चांदीचा घोडा व पादुका चोरल्याचे आणि इतरांच्या मदतीने विक्रीचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणात आदित्य विलास बगाडे (२१), अथर्व विलास बगाडे (१९), अथर्व राजेंद्र ननावरे (१९), कुंदन सुनील काजळे (२५) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकावर कारवाई करण्यात आली आहे.

संशयितांकडून हस्तगत करण्यात आलेल्या चांदीच्या वस्तू फिर्यादीस दाखविल्यानंतर त्यांनी त्या म्हसोबा मंदिरातीलच असल्याची खात्रीपूर्वक ओळख पटविली. त्यानंतर सोनारामार्फत वजन व शुद्धतेची तपासणी करून कायदेशीर पंचनाम्याद्वारे मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, चोरीपूर्वी रेकी करण्यात आली होती का आणि चोरीचा माल कोणाला विक्री केला जाणार होता, याचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासी अंमलदार पोलीस हवालदार यशवंत पवार व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे या चोरीचा यशस्वी पर्दाफाश केला.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D