स्थानिक

सापडलेला आयफोन पोलीसांच्या स्वाधीन; बारामतीकरांच्या प्रामाणिकपणाचा आदर्श

दागिने असलेले पाकीट सापडले होते.

सापडलेला आयफोन पोलीसांच्या स्वाधीन; बारामतीकरांच्या प्रामाणिकपणाचा आदर्श

दागिने असलेले पाकीट सापडले होते.

बारामती वार्तापत्र

मोबाईल, रोख रक्कम किंवा दागिने सापडल्यास ते स्वतःकडे ठेवण्याचा मोह अनेकांना होऊ शकतो. मात्र बारामतीतील काही सजग नागरिकांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत सापडलेल्या मौल्यवान वस्तू पोलीसांच्या स्वाधीन करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

रामगल्ली येथील अजय राजेंद्र चव्हाण व वर्षा चव्हाण हे भाऊ-बहीण जामदार रोड परिसरातील डॉ. भगत वस्ती शेजारी फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना रस्त्याच्या कडेला एक आयफोन मोबाईल सापडला. मोबाईलचा मालक शोधून त्याला वस्तू परत मिळावी या उद्देशाने त्यांनी कोणताही मोह न बाळगता तो थेट बारामती शहर पोलीस ठाण्यात जमा केला. प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी त्यांच्याकडून मोबाईल ताब्यात घेतला.

यापूर्वी ११ जून रोजी सौ. गौरी अनिल दाने व गौरव आसलकर यांना बस प्रवासादरम्यान रोख सहा हजार रुपये आणि कानातील सोन्याचे असल्याचा संशय असलेले दागिने असलेले पाकीट सापडले होते. त्यांनीही सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत सदर मुद्देमाल पोलीस ठाण्यात जमा केला होता.

हरवलेल्या वस्तू परत मिळवून देण्याच्या कामात अशा प्रामाणिक नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नागरिकांकडून मिळणाऱ्या सहकार्यामुळे हरवलेले मोबाईल, रोख रक्कम, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू मूळ मालकांपर्यंत पोहोचविणे अधिक सुलभ होत आहे.
प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी अजय चव्हाण, वर्षा चव्हाण, गौरी दाने आणि गौरव आसलकर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. समाजात अशा जबाबदार नागरिकांची गरज असून, हरवलेल्या अथवा सापडलेल्या वस्तूंबाबत माहिती असल्यास नागरिकांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, सध्या पोलीस ठाण्यात जमा असलेला आयफोन ज्यांचा हरवला आहे, त्यांनी आवश्यक कागदपत्रे, ओळख व मालकीचे पुरावे सादर करून बारामती शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

समाजातील नैतिक मूल्ये आणि प्रामाणिकपणा आजही जिवंत असल्याचे या घटनांमधून अधोरेखित होत असून, अशा नागरिकांमुळे समाजातील विश्वास आणि सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Back to top button