क्राईम रिपोर्ट

१० ते १५ टक्के मासिक परताव्याचे आमिष; बारामतीत ६५ लाखांची फसवणूक, आणखी गुंतवणूकदारांनी पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन

आकर्षक आश्वासने देण्यात आली होती

१० ते १५ टक्के मासिक परताव्याचे आमिष; बारामतीत ६५ लाखांची फसवणूक, आणखी गुंतवणूकदारांनी पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन

आकर्षक आश्वासने देण्यात आली होती

बारामती वार्तापत्र 

शेअर मार्केट आणि फॉरेक्स ट्रेडिंगमधून दरमहा १० ते १५ टक्के निश्चित परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची तब्बल ६५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी अनेक फसवणूकग्रस्त असल्याची शक्यता व्यक्त करत पोलिसांनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८, ३४०, ३(५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण अधिनियम १९९९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार कार्तिक अरविंद नाळे, गौरव अरविंद नाळे, बिग बुल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेडिंग अँड फायनान्स आणि बिग बुल ट्रेडिंग कंपनी यांनी स्वतःला शेअर मार्केटमधील तज्ज्ञ, अनुभवी ट्रेडर तसेच सेबी मान्यताप्राप्त व्यक्ती असल्याचे भासवून नागरिकांना विविध गुंतवणूक योजनांमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

आरोपींकडून गुंतवणूकदारांना दरमहा १० ते १५ टक्के निश्चित परतावा, मूळ रक्कम सुरक्षित राहील, तोटा झाल्यास जबाबदारी स्वतः घेण्यात येईल तसेच मुदत संपल्यानंतर संपूर्ण रक्कम परत केली जाईल, अशी आकर्षक आश्वासने देण्यात आली होती. या आश्वासनांवर विश्वास ठेवून फिर्यादी आणि इतर साक्षीदारांनी रोख, यूपीआय, एनईएफटी, आरटीजीएस आदी माध्यमांतून सुमारे ६५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

नोटरी करारनाम्यात कबुली

तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या कागदपत्रांनुसार एका गुंतवणूकदाराकडून स्वीकारलेल्या ४९ लाख रुपयांच्या रकमेबाबत आरोपींनी नोटरीकृत करारनाम्यामध्ये स्पष्ट कबुली दिल्याचे समोर आले आहे. या करारनाम्यात गुंतवणुकीवर दरमहा १० ते १५ टक्के परतावा देण्याचा उल्लेख असून संबंधित गुंतवणूकदाराला अपेक्षित परतावा आणि मूळ रक्कमही न दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.

धनादेशही अनादरित

गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींकडून काहींना धनादेश देण्यात आले होते. मात्र त्यापैकी काही धनादेश बँकेकडून अनादरित (डिशॉनर्ड) झाल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचा आवाका आणखी मोठा असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

आणखी पीडितांचा शोध

सदर प्रकरणात अनेक गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविले असण्याची शक्यता असून अद्याप सर्व पीडित पुढे आलेले नाहीत. त्यामुळे बिग बुल ट्रेडिंग कंपनी, बिग बुल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेडिंग अँड फायनान्स किंवा संबंधित व्यक्तींच्या माध्यमातून शेअर मार्केट, फॉरेक्स ट्रेडिंग, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, ट्रेडिंग कोर्स अथवा निश्चित परतावा योजनांमध्ये गुंतवणूक केलेल्या सर्व नागरिकांनी तातडीने बारामती शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुरावे घेऊन पोलीस ठाण्यात येण्याचे आवाहन

फसवणूकग्रस्तांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट, यूपीआय व्यवहारांची माहिती, एनईएफटी-आरटीजीएस पावत्या, धनादेश, करारनामे, व्हॉट्सअ‍ॅप संदेश, ई-मेल, जाहिराती, ट्रेडिंग कोर्स फी पावत्या, कथित प्रमाणपत्रे, फोटो, व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि इतर उपलब्ध पुरावे सोबत आणावेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रक्तदीप भंडारे करीत आहेत.

फसवणूकग्रस्तांना न्याय मिळवून देणे आणि या प्रकरणातील सर्व पीडितांचा शोध घेऊन वस्तुस्थिती समोर आणणे हेच उद्दिष्ट असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, नागरिकांनी तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच माहिती देणाऱ्यांची ओळख व कागदपत्रांची गोपनीयता राखली जाईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Back to top button