बारामती नगरपरिषदेला अत्याधुनिक सीवर सक्शन-जेटिंग-डीवॉटरिंग मशीन; स्वच्छता व्यवस्थेत नवे पर्व
बारामती नगरपरिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला मिळणार नवे बळ.

बारामती नगरपरिषदेला अत्याधुनिक सीवर सक्शन-जेटिंग-डीवॉटरिंग मशीन; स्वच्छता व्यवस्थेत नवे पर्व
बारामती नगरपरिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला मिळणार नवे बळ.
बारामती वार्तापत्र
बारामती शहराची स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि आधुनिक करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे बारामती नगरपरिषदेला अत्याधुनिक कंबाईंड सीवर सक्शन, जेटिंग आणि डीवॉटरिंग मशीन उपलब्ध झाले आहे. हे अत्याधुनिक वाहन उद्या बारामती नगरपरिषदेच्या प्रांगणात दाखल होत असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या आगामी बारामती दौऱ्यात त्याचे लोकार्पण करून ते बारामतीकरांच्या सेवेत समर्पित करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांनी बारामतीमध्ये स्वच्छ, सुंदर आणि हरित शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले. स्वच्छता ही केवळ नगरपालिकेची जबाबदारी नसून ती शहराच्या संस्कृतीचा आणि विकासाचा अविभाज्य भाग आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. शहरातील स्वच्छता व्यवस्थेसाठी त्यांनी सातत्याने आधुनिक सुविधा, यंत्रसामग्री आणि सक्षम व्यवस्थापनावर भर दिला. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांनी बारामतीला ही अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून दिली असून, दादांच्या स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक बारामतीच्या संकल्पनेला त्यांनी पुढे नेण्याचे काम केले आहे.
सुमारे १८ टन चेसिसवर उभारण्यात आलेल्या या वाहनाची किंमत 1 कोटी असून या आधुनिक वाहनामध्ये ८,००० लिटर क्षमतेची टाकी असून त्यापैकी ४,००० लिटर गाळासाठी आणि ४,००० लिटर पाण्यासाठी राखीव आहे. यामध्ये ३,००० m³/hr क्षमतेचा व्हॅक्यूम पंप, १७० बार दाबाने ३२० LPM प्रवाह देणारा हाय-प्रेशर जेटिंग पंप तसेच ४,००० LPM क्षमतेचा डीवॉटरिंग पंप बसविण्यात आला आहे. त्यामुळे सीवर लाईनमधील गाळ काढणे, चेंबर साफ करणे, तुंबलेली गटारे मोकळी करणे तसेच पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा जलद उपसा करणे ही सर्व कामे अत्यंत कार्यक्षमतेने करता येणार आहेत.
ही मशीन राज्य शासनाच्या “मॅनहोलकडून मशीनहोलकडे” या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत उपलब्ध झाली आहे. या माध्यमातून मॅनहोल, भूमिगत गटारे, मलजल वाहिन्या, सेप्टिक टाक्या, सिव्हेज टाक्या तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने केली जाणार असून, स्वच्छता कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून गटारात उतरावे लागणार नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला मोठे बळ मिळणार आहे.
बारामती शहरातील अनेक सीवर चेंबर्स १० ते १५ फूट खोल असल्यामुळे अनेक वेळा स्वच्छता कर्मचाऱ्यांना अत्यंत धोकादायक परिस्थितीत काम करावे लागत होते. शहराचा वाढता विस्तार आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अत्याधुनिक मशीनची आवश्यकता ओळखत नगराध्यक्ष सचिन सातव, मुख्याधिकारी पंकज भुसे आणि आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करून सातत्याने पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या सकारात्मक निर्णयामुळे बारामतीला ही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाली आहे.
या मशीनमुळे स्वच्छता कामे अधिक वेगाने, सुरक्षितपणे आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने होणार असून, आपत्कालीन परिस्थितीत पाणी उपसा करण्यासाठीही नगरपरिषदेला मोठी मदत मिळणार आहे. परिणामी बारामतीची स्वच्छता व्यवस्था अधिक आधुनिक, सक्षम आणि परिणामकारक होण्यास मोठी चालना मिळणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष सचिन सातव आणि आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी दिली.
चौकट : १
“आदरणीय स्वर्गीय अजितदादांनी बारामतीच्या स्वच्छतेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. स्वच्छता व्यवस्थेसाठी आधुनिक यंत्रणा उभारण्यावर त्यांचा कायम भर होता. त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे नेत आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी बारामतीच्या गरजा ओळखून ही अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून दिली आहे. यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षितता वाढेल, नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा मिळेल आणि स्वच्छ, सुंदर बारामतीचे दादांचे स्वप्न अधिक बळकट होईल.”
– श्री. सचिन सातव
नगराध्यक्ष, बारामती नगरपरिषद.
चौकट : २
“आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार या राज्याची महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असतानाही बारामतीच्या विकासाकडे विशेष लक्ष देतात. ‘आदरणीय स्वर्गीय अजितदादांनी बारामतीला जे दिले, त्या विकासाच्या परंपरेत आपण आणखी काय भर घालू शकतो,’ हा विचार त्या सातत्याने करत असतात. त्याच भावनेतून त्यांनी बारामतीला ही अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून दिली आहे. ही केवळ एक मशीन नसून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी आणि बारामतीच्या आधुनिक स्वच्छता व्यवस्थेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे.”
– श्री. नवनाथ बल्लाळ
आरोग्य सभापती, बारामती नगरपरिषद.






