स्थानिक

सूर्याभोवती तेजस्वी वलय; बारामतीकरांना ‘सोलर हेलो’चे दुर्मीळ दर्शन!

पूर्णपणे नैसर्गिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली घटना आहे.

सूर्याभोवती तेजस्वी वलय; बारामतीकरांना ‘सोलर हेलो’चे दुर्मीळ दर्शन!

पूर्णपणे नैसर्गिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली घटना आहे.

बारामती वार्तापत्र 

दुपारच्या सुमारास बारामतीसह परिसरातील नागरिकांना आकाशात एक दुर्मीळ आणि मनमोहक नैसर्गिक दृश्य पाहायला मिळाले. सूर्याभोवती इंद्रधनुष्यासारखे तेजस्वी गोलाकार वलय निर्माण झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

काही काळ टिकून राहिलेल्या या अद्भुत दृश्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले, तर छायाचित्रप्रेमींनी हा दुर्मीळ क्षण मोबाईल आणि कॅमेऱ्यात कैद करत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला.

हवामानशास्त्रात या घटनेला ‘सोलर हेलो’ (Solar Halo) असे म्हटले जाते. पृथ्वीपासून उंचावर असलेल्या सिरोस्ट्रॅटस (Cirrostratus) ढगांतील सूक्ष्म बर्फाच्या षटकोनी स्फटिकांमधून सूर्यप्रकाशाचे अपवर्तन आणि परावर्तन झाल्यामुळे सूर्याभोवती सुमारे २२ अंशांचा प्रकाशाचा गोलाकार कडा तयार होतो.

त्यामुळे सूर्याभोवती इंद्रधनुष्याच्या रंगछटांसारखे वलय दिसून येते. ही पूर्णपणे नैसर्गिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली घटना आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे सोलर हेलो दिसणे हे वातावरणात आर्द्रता वाढत असल्याचे संकेत असू शकतात. त्यामुळे पुढील २४ ते ४८ तासांत ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र, या घटनेचा कोणत्याही शुभ-अशुभ किंवा धार्मिक समजुतींशी संबंध नसून ती केवळ वातावरणातील नैसर्गिक बदलांमुळे घडणारी प्रकाशीय घटना असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

बारामतीमध्ये यापूर्वीही अधूनमधून अशी घटना दिसली असली, तरी यावेळी तेजस्वी आणि स्पष्ट वलयामुळे अनेक नागरिकांनी आकाशाकडे पाहत या निसर्गाच्या अनोख्या कलाकृतीचा आनंद घेतला. काही मिनिटे टिकलेल्या या दृश्याने शहरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून, दिवसातील चर्चेचा विषय ठरला.

Back to top button