स्थानिक

वारकरी सेवेसाठी बारामतीतील हॉटेल मधुबनचा हातभार; नगरपरिषदेला २०० कोरोगेटेड बॉक्स भेट

पालखी सोहळ्यात मोबाईल चार्जिंग व पिण्याच्या पाण्याचीही सुविधा; सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम

वारकरी सेवेसाठी बारामतीतील हॉटेल मधुबनचा हातभार; नगरपरिषदेला २०० कोरोगेटेड बॉक्स भेट

पालखी सोहळ्यात मोबाईल चार्जिंग व पिण्याच्या पाण्याचीही सुविधा; सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम

बारामती वार्तापत्र 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि शहरातील स्वच्छता व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी बारामतीतील हॉटेल मधुबनचे संचालक सचिन झगडे यांनी यंदाही सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मातोश्री सौ. सुमन उद्धवराव झगडे यांच्या हस्ते बारामती नगरपरिषदेला स्वच्छता व्यवस्थेसाठी २०० कोरोगेटेड बॉक्स सुपूर्द करण्यात आले.

पालखी सोहळ्यादरम्यान शहरात लाखो वारकरी दाखल होत असल्याने स्वच्छता राखणे हे नगरपरिषदेपुढील मोठे आव्हान असते. हे लक्षात घेऊन हॉटेल मधुबनने स्वच्छता साहित्य उपलब्ध करून देत प्रशासनाच्या कार्याला मोलाचा हातभार लावला आहे. याशिवाय वारकऱ्यांच्या सोयीसाठी मोफत मोबाईल चार्जिंग पॉइंटची व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याचे वाटपही करण्यात येणार आहे.

यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, मुख्याधिकारी पंकज भुसे, बांधकाम समिती सभापती अमर धुमाळ, पाणीपुरवठा समिती सभापती मनीषा समीर चव्हाण, मनीषा बनकर, गोरख पारसे, विशाल हिंगणे, अमोल कावळे, वैभव जगताप, आरोग्य विभाग प्रमुख स्वरूप अहिवाळे, अजय लालबिगे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालखी सोहळा हा बारामतीच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग मानला जातो. दरवर्षी लाखो वारकरी शहरात दाखल होत असल्याने स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य आणि मूलभूत सुविधांचे प्रभावी नियोजन करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. अशा वेळी सामाजिक संस्था, उद्योजक आणि नागरिकांकडून मिळणारे सहकार्य प्रशासनाचे बळ वाढवणारे ठरत आहे.

चौकट : नगराध्यक्ष सचिन सातव म्हणाले…

“आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांनी बारामतीत येणारा पालखी सोहळा अधिक भव्य, दिव्य आणि दिमाखदार व्हावा यासाठी नेहमीच विशेष प्रयत्न केले. आज राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा वहिनी पवार सुद्धा पालखी सोहळ्याच्या तयारीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अशा वेळी बारामती नगरपरिषदेच्या कार्याला हातभार लावण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था, उद्योजक आणि नागरिक पुढे येत आहेत, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. समाजासाठी योगदान देणाऱ्या अशा प्रत्येक व्यक्तीचे आणि संस्थेचे बारामती नगरपरिषदेच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करण्यात येईल.”

चौकट : मुख्याधिकारी पंकज भुसे यांचे आवाहन

“पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी बारामती नगरपरिषद प्रशासन आणि कर्मचारी वर्ग मनापासून कार्यरत आहे. आमच्या कार्याला सेवाभावी संस्था आणि नागरिकांचा हातभार लाभत असल्यामुळे कर्मचारी वर्गाचा उत्साह अधिक वाढत आहे. पालखी सोहळ्यासाठी कोणत्याही स्वरूपात मदत करायची असल्यास सामाजिक संस्था, उद्योजक आणि सेवाभावी नागरिकांनी पुढे यावे. प्रशासन अशा सर्व सहकार्याचे स्वागत करेल.”

वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या बारामतीच्या परंपरेला साजेसा हा उपक्रम असून, हॉटेल मधुबन आणि सचिन झगडे परिवाराने केलेले योगदान इतर उद्योजक व सेवाभावी संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने प्रशासन आणि समाज यांच्यातील समन्वयाचे हे आणखी एक सकारात्मक उदाहरण म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

Back to top button