एसआयआर मोहिमेत बारामतीची शंभर टक्के कामगिरी; प्रशासनाकडून गौरव
शहरातील भाग क्रमांक १२३ मध्ये एकूण १,०१३ मतदारांची पडताळणी करण्यात आली.

एसआयआर मोहिमेत बारामतीची शंभर टक्के कामगिरी; प्रशासनाकडून गौरव
शहरातील भाग क्रमांक १२३ मध्ये एकूण १,०१३ मतदारांची पडताळणी करण्यात आली.
बारामती वार्तापत्र
विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत बारामती शहरातील नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या भागातील काम १०० टक्के पूर्ण झाल्याने निवडणूक प्रशासनाने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव केला. बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) सौ. निलम काशीद यांनी अचूक नियोजन व वेळेत काम पूर्ण केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
बारामती शहरातील भाग क्रमांक १२३ मध्ये एकूण १,०१३ मतदारांची पडताळणी करण्यात आली. त्यापैकी ८५४ मतदारांची डिजिटल नोंदणी पूर्ण करण्यात आली असून, नोंदणीकृत पत्त्यावर उपलब्ध नसलेल्या मतदारांचीही स्वतंत्र नोंद घेण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनीही सक्रिय सहकार्य केले.
मोहिमेदरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत परिश्रम घेत नियोजित वेळेत काम पूर्ण केले. सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मुख्याधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे पार पडल्याचे प्रशासनाने सांगितले.
अचूक आणि अद्ययावत मतदार यादी तयार करण्यासाठी बीएलओ, कर्मचारी व प्रशासनाने केलेल्या समन्वयपूर्ण प्रयत्नांचे यावेळी कौतुक करण्यात आले. भविष्यातील निवडणुका अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि सक्षम करण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.







