हरित शिक्षणात बारामतीचा झेंडा; डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाचा देशात गौरव

हरित शिक्षणात बारामतीचा झेंडा; डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाचा देशात गौरव
९०.२ गुणांसह ‘गोल्ड रेटिंग’; बारामतीच्या कृषी शिक्षणाला राष्ट्रीय मान्यता
बारामती वार्तापत्र
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाने राष्ट्रीय ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग (NGUR-2026) मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत देशात २४वा क्रमांक मिळवला असून ९०.२ गुणांसह ‘गोल्ड रेटिंग’ प्राप्त केले आहे. याबाबतची अधिकृत माहिती ग्रीन मेंटोर संस्थेने महाविद्यालयाला दिलेल्या पत्राद्वारे जाहीर केली आहे.
या मानांकनात स्थान मिळवणारे बारामतीतील हे भारतातील एकमेव खाजगी कृषी महाविद्यालय ठरले आहे. महाराष्ट्रातून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने देशात १८वे स्थान मिळवले आहे.
ग्रीन मेंटोर संस्थेकडून शाश्वत प्रशासन, हरित परिसर, पर्यावरण व्यवस्थापन, जैवविविधता, हवामान कृती, ऊर्जा कार्यक्षमता, संशोधन व नवोपक्रम, अभ्यासक्रमातील शाश्वतता, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था आणि सामाजिक उपक्रम अशा विविध निकषांवर महाविद्यालयाचे मूल्यमापन करण्यात आले.
अलीकडेच एफएओच्या जागतिक परिषदेत बारामतीने आपला ठसा उमटवला असून, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृषी संशोधन क्षेत्रातही संस्थेने उल्लेखनीय कार्य केले आहे. या यशामुळे पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी सामना आणि शाश्वत विकासासाठी महाविद्यालयाची बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली आहे.
याबाबत संस्थेचे प्रमुख राजेंद्रदादा पवार म्हणाले, “हा सन्मान संपूर्ण शारदानगर परिवारासाठी अभिमानाचा क्षण आहे. प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित आहे. पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण, ऊर्जा बचत, जलसंधारण आणि हरित परिसर निर्मितीसाठी राबविलेल्या उपक्रमांची ही राष्ट्रीय स्तरावर घेतलेली दखल आहे.”
संस्थेच्या विश्वस्त सुनंदा पवार, इतर विश्वस्त तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे यांनीही या यशाबद्दल समाधान व्यक्त करत विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.






