कृषी

मुढाळे येथे महिलांसाठी मका पिकाची शेतीशाळा संपन्न

दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रशिक्षण; अल्प खर्चात नैसर्गिक कीटकनाशक तयार करण्याचा महिला शेतकऱ्यांचा निर्धार

मुढाळे येथे महिलांसाठी मका पिकाची शेतीशाळा संपन्न

दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रशिक्षण; अल्प खर्चात नैसर्गिक कीटकनाशक तयार करण्याचा महिला शेतकऱ्यांचा निर्धार

बारामती वार्तापत्र 

पिकांची लागवड ते काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान, कीड-रोग व्यवस्थापन आणि आधुनिक शेती पद्धतींची माहिती महिला शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी मौजे मुढाळे येथे बळीराजा नैसर्गिक शेतकरी गटातील महिला शेतकऱ्यांसाठी मका पिकाच्या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले.

मागील दोन महिन्यांपासून मका पिकाच्या शेतीशाळा वर्गांचे आयोजन करण्यात येत असून, आतापर्यंत तीन वर्ग पूर्ण झाले आहेत. या शेतीशाळेत मका पिकावर प्रामुख्याने आढळणाऱ्या लष्करी अळीचे नियंत्रण करण्यासाठी दशपर्णी अर्क निर्मितीबाबत महिला शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

दशपर्णी अर्क घरीच तयार करून अल्प खर्चात प्रभावी नैसर्गिक कीटकनाशकाची निर्मिती करता येते. त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांवरील खर्च कमी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळू शकते. यासाठी महिला शेतकऱ्यांनी स्वतः दशपर्णी अर्क तयार करून त्याचा वापर करण्याचा निर्धार केला.

यावेळी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुरज मडके तसेच बारामतीचे तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी मार्गदर्शन केले.

शेतीशाळेला ज्योती दरेकर, सहायक कृषी अधिकारी आरती कांबळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर आणि सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव यांची उपस्थिती होती.

महिला शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कृतीतून प्रशिक्षण देत नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा या शेतीशाळेचा उपक्रम ठरत आहे.

Back to top button