क्राईम रिपोर्ट

बारामतीत कमरेला गावठी पिस्तूल अन् दोन जिवंत काडतुसे; सराईत आरोपी जेरबंद

तीन साथीदार फरार; शस्त्र कुणासाठी आणि कशासाठी याचा पोलिसांकडून सखोल तपास — तीन वर्षांत गोपनीय माहितीच्या आधारे सहा अग्निशस्त्रे हस्तगत

बारामतीत कमरेला गावठी पिस्तूल अन् दोन जिवंत काडतुसे; सराईत आरोपी जेरबंद

तीन साथीदार फरार; शस्त्र कुणासाठी आणि कशासाठी याचा पोलिसांकडून सखोल तपास — तीन वर्षांत गोपनीय माहितीच्या आधारे सहा अग्निशस्त्रे हस्तगत

बारामती वार्तापत्र 

बारामती शहर व परिसरात बेकायदेशीर अग्निशस्त्रे व घातक हत्यारे बाळगून फिरणाऱ्या व्यक्तींविरुद्ध बारामती शहर पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. याच मोहिमेत मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून प्रदीप सुरेश नकाते (वय २७, रा. महात्मा फुलेनगर, आमराई, बारामती) याला देशी बनावटीच्या गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह जेरबंद केले.

दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, प्रदीप नकाते हा कमरेला पिस्तूल खोचून काही साथीदारांसह फिरत असून, त्यांच्याकडे कोयत्यासारखी घातक हत्यारे आहेत. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत इंगवले यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून सापळा रचण्यात आला.

पोलिसांनी प्रदीप नकाते याला ताब्यात घेतल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला काळसर रंगाचे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आढळून आले. पिस्तुलाच्या मॅगझीनमध्ये दोन जिवंत काडतुसे मिळाली. पिस्तुलाची अंदाजे किंमत २५ हजार रुपये, तर काडतुसांची किंमत ४०० रुपये असून एकूण २५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईची चाहूल लागताच नकाते याच्यासोबत असलेले अन्य इसम घटनास्थळावरून पसार झाले. तपासादरम्यान अजय नंदकुमार सकट, रोहीत अशोक सोनवणे आणि गणेश पाठक, तिघेही रा. आमराई, बारामती, यांची नावे संशयित म्हणून निष्पन्न झाली आहेत. तिघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तपास पथके सक्रिय करण्यात आली आहेत.

या शस्त्रांचा नेमका उद्देश काय होता, फरार संशयितांकडे कोणती हत्यारे होती, नकाते व त्याचे साथीदार एकत्रित का फिरत होते, तसेच कोणत्याही गंभीर गुन्ह्याचे पूर्वनियोजन करण्यात आले होते का, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

नकातेकडून यापूर्वीही पिस्तूल जप्त

प्रदीप नकाते याची यापूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमीही तपासात समोर आली आहे. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी त्याच्याकडून बेकायदेशीर गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. त्यावेळी बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४३९/२०२५ अन्वये शस्त्र अधिनियमाच्या कलम ३ व २५ नुसार कारवाई करण्यात आली होती.

एकाच आरोपीकडून पुन्हा बेकायदेशीर अग्निशस्त्र मिळून आल्याने पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. पिस्तूल कोठून व कोणाकडून मिळाले, त्यामागे आर्थिक व्यवहार झाला का, शस्त्रपुरवठ्याची साखळी कोणती आहे आणि त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.

तीन वर्षांत सहा अग्निशस्त्रे हस्तगत

या कारवाईतील विशेष बाब म्हणजे पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांच्या गोपनीय माहिती संकलनामुळे मागील तीन वर्षांत बारामती शहर पोलिसांनी सहा अग्निशस्त्रे हस्तगत केली आहेत. स्थानिक पातळीवर तयार केलेल्या विश्वासार्ह माहिती-जाळ्याच्या माध्यमातून संभाव्य गुन्हेगारी हालचालींची माहिती मिळवून वेळेत कारवाई करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानदेव विष्णू क्षीरसागर हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. तपासातून आणखी अग्निशस्त्रे किंवा घातक हत्यारे हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत इंगवले व पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई अक्षय सिताफ, पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर, पोलीस हवालदार यशवंत पवार, पोलीस शिपाई गिरीश नेवसे, सागर जामदार, विशाल शिंदे, कवितके, विजय ओंबासे आणि विशाल चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, बेकायदेशीर अग्निशस्त्रे, कोयते किंवा इतर घातक हत्यारे बाळगणाऱ्या व्यक्तींबाबत विश्वसनीय माहिती असल्यास ती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले असून, माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button