जनतेच्या पैशातून पदाधिकाऱ्यांची ‘मौज’?; संस्थेच्या वाहन वापरावरून बारामतीत खळबळ
अंत्यविधीपासून लग्नसमारंभापर्यंत संस्थेच्या गाड्या?

जनतेच्या पैशातून पदाधिकाऱ्यांची ‘मौज’?; संस्थेच्या वाहन वापरावरून बारामतीत खळबळ
अंत्यविधीपासून लग्नसमारंभापर्यंत संस्थेच्या गाड्या?
बारामती वार्तापत्र
प्रादेशिक पक्षाच्या ताब्यात असलेल्या एका संस्थेतील वाहनांच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संस्थेच्या कामासाठी उपलब्ध असलेल्या वाहनांचा काही पक्षपदाधिकाऱ्यांकडून कथितपणे वैयक्तिक कामांसाठी वापर होत असल्याची चर्चा असून, त्यामुळे संस्थेच्या निधीच्या वापराबाबत नागरिकांकडून सवाल उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संस्थेची वाहने काही पदाधिकारी स्वतःच्या घरून ये-जा करण्यासाठी वापरत असल्याचा आरोप आहे. तसेच नातेवाईकांच्या अंत्यविधी, लग्नसमारंभ आणि इतर खासगी कार्यक्रमांसाठीही संस्थेच्या वाहनांचा वापर होत असल्याची चर्चा आहे.
खासगी आलिशान गाडीचा खर्च संस्थेच्या खात्यावर?
यापेक्षाही गंभीर आरोप म्हणजे काही नामचीन पदाधिकारी स्वतःच्या आलिशान खासगी वाहनातून प्रवास करत असताना, त्या वाहनासाठी लागणाऱ्या डिझेलचा खर्च तसेच देखभाल-दुरुस्तीचा खर्च संस्थेच्या निधीतून केला जात असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे हा खर्च संस्थेच्या अन्य वाहनांच्या नावावर दाखवला जात असल्याचीही चर्चा आहे.
हे आरोप कागदोपत्री तपासात खरे ठरल्यास संस्थेच्या निधीच्या संभाव्य गैरवापराबाबत गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित संस्थेचे वाहन लॉगबुक, डिझेल पावत्या, वाहन क्रमांक, दुरुस्तीची बिले आणि संबंधित कालावधीतील लेखापरीक्षण नोंदी तपासण्याची मागणी होत आहे.
‘नामचीन’ पदाधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार?
संस्थेच्या मालमत्तेचा वापर पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक कामांसाठी होत असेल, तर त्याला जबाबदार कोण? संस्थेचा पैसा खासगी वाहनांच्या इंधन व दुरुस्तीवर खर्च होत असेल, तर त्याची चौकशी कोण करणार? संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार, तसेच वरिष्ठ अधिकारी या प्रकाराची दखल केव्हा घेणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
संस्थेच्या वाहनांचा वापर आणि त्यावर झालेल्या खर्चाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून, आरोप तथ्यात्मक ठरल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यामुळे वरिष्ठ प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन कागदोपत्री तपास करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित संस्था अथवा पदाधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. त्यांची बाजू उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.






