खूनप्रकरणातील फरार आरोपीसह वॉरंटवरील आरोपी ताब्यात; बारामती शहर पोलिसांची दुहेरी कारवाई
कायद्याला चकवा देणाऱ्यांची खैर नाही!

खूनप्रकरणातील फरार आरोपीसह वॉरंटवरील आरोपी ताब्यात; बारामती शहर पोलिसांची दुहेरी कारवाई
कायद्याला चकवा देणाऱ्यांची खैर नाही!
बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर खूनप्रकरणात तब्बल ७२५ दिवसांपासून फरार असलेला पाहिजे आरोपी अनिकेत संजय पवार (वय २०, रा. जगतापमळा, खंडोबानगर, बारामती) याला बारामती शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. याच गुन्ह्यातील न्यायालयीन प्रक्रियेला गैरहजर राहिल्याने अटक वॉरंट जारी असलेला भोल्या उर्फ किशोर बापू भिसे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६४६/२०२४ अन्वये खूनप्रकरणी गुन्हा दाखल आहे. २२ ऑगस्ट २०२४ रोजी दाखल झालेल्या या गुन्ह्यातील आरोपी अनिकेत पवार हा पोलिसांना मिळून येत नव्हता. त्याचा सातत्याने शोध घेत असताना पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांना गोपनीय बातमीदारामार्फत अनिकेत हा माळावरची देवीजवळील जवाहर पार्क परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.
माहितीची खातरजमा करून वरिष्ठांना कळविल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने जवाहर पार्क परिसरात सापळा रचला. आरोपी तेथे येताच पोलिसांची चाहूल लागल्याने त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून १७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५५ वाजता त्याला अटक करण्यात आली.
पूर्ववैमनस्यातून गणेश वाघमोडे याचा खून
या प्रकरणाची पार्श्वभूमी गंभीर आहे. फिर्यादी नवनाथ उत्तम चोरमले यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा १७ वर्षीय भाचा गणेश धुळाबापू वाघमोडे याचे सन २०२३ मध्ये टी.सी. कॉलेज परिसरात जयेश बाबासाहेब माने व त्याच्या साथीदारांशी भांडण झाले होते. या पूर्ववैमनस्यातून २१ ऑगस्ट २०२४ रोजी गणेश मित्रांसोबत कपडे खरेदी करून जळोचीच्या दिशेने जात असताना त्याचा पाठलाग करण्यात आल्याचा आरोप आहे.
जळोची येथील काळ्या ओढ्याच्या पुलाजवळ चारचाकी वाहनातून आलेल्या व्यक्तींनी रस्ता अडवून गणेशवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर शोध घेतला असता गणेश ओढ्याजवळील शेतात रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळला. त्याच्या डोके, मान आणि शरीराच्या इतर भागांवर धारदार शस्त्राने वार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.
या घटनेप्रकरणी २२ ऑगस्ट २०२४ रोजी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान जयेश बाबासाहेब माने, शुभम प्रवीण गायकवाड, करण हनुमंत जाधव, आतिश संतोष गुरळकर, सोमनाथ रंगनाथ यादव, भोल्या उर्फ किशोर बापू भिसे, बंडू भिवा काळे उर्फ बी.के., अनिकेत संजय पवार तसेच इतर आरोपींच्या भूमिकेचा तपास करण्यात आला. विविध आरोपींना अटक करून गुन्ह्यात वापरलेली वाहने व धारदार हत्यारे जप्त करण्यात आली. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयात दोषारोपपत्रही सादर करण्यात आले.
दरम्यान, अनिकेत पवार हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. तपासादरम्यान गुन्ह्यानंतर काही आरोपींच्या संपर्कात राहून त्यांना चारचाकी वाहनातून बाहेरगावी नेऊन सोडल्याचा तपासातील भाग समोर आला होता. आरोपी ताब्यात आल्यानंतर त्याच्याकडील चारचाकी वाहनाबाबतही तपास व जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
न्यायालयीन वॉरंटवरील आरोपीही ताब्यात
याच गुन्ह्यातील भोल्या उर्फ किशोर बापू भिसे हा जामिनावर असताना न्यायालयीन तारखांना हजर राहत नसल्याने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्याचाही शोध सुरू असताना पोलीस हवालदार टापरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत त्याच्या ठिकाणाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला बारामती शहर पोलीस ठाणे हद्दीतून ताब्यात घेऊन वॉरंटची कायदेशीर अंमलबजावणी केली.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
जुन्या फरार आरोपींविरोधात विशेष मोहीम
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या निर्देशानुसार सन २००० पासून आजपर्यंतच्या जुन्या गुन्ह्यांतील फरार, पाहिजे तसेच न्यायालयीन प्रक्रियेला गैरहजर राहणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी जुन्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन फरार आरोपींची माहिती अद्ययावत करणे, त्यांच्या जुन्या व सध्याच्या वास्तव्याचा शोध घेणे आणि गोपनीय माहितीचे जाळे सक्रिय ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार यशवंत पवार, ज्ञानदेव क्षीरसागर, पोलीस शिपाई अक्षय सिताफ, गिरीश नेवसे, सागर जामदार आणि विशाल शिंदे यांच्या पथकाने अनिकेत पवारला पकडण्याची कारवाई केली. तर भोल्या उर्फ किशोर भिसे याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस हवालदार टापरे व संबंधित पथकाने कामगिरी बजावली.
गुन्हा कितीही जुना असो आणि आरोपी कितीही काळ फरार राहिला तरी कायद्याच्या प्रक्रियेपासून कायमची सुटका होऊ शकत नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. फरार तसेच न्यायालयीन प्रक्रियेला टाळणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे बारामती शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.






