राजकीय

विकासकामांपासून गुन्हेगारीपर्यंत युगेंद्र पवारांचा सत्ताधाऱ्यांना आरसा; ‘दादांसारखा वचक निर्माण करा’

निनावी पत्रांवर पवारांचा सवाल; ‘नाव लिहा, चर्चा करू आणि अडचणी समजून घेऊ!’

विकासकामांपासून गुन्हेगारीपर्यंत युगेंद्र पवारांचा सत्ताधाऱ्यांना आरसा; ‘दादांसारखा वचक निर्माण करा’

निनावी पत्रांवर पवारांचा सवाल; ‘नाव लिहा, चर्चा करू आणि अडचणी समजून घेऊ!’

बारामती वार्तापत्र

बारामती शहर व तालुक्यातील वाढती गुन्हेगारी, विकासकामे, निनावी पत्रे आणि आगामी राजकीय समीकरणांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ‘बारामती पोरकी झाली का?’ या प्रश्नावर बोलताना त्यांनी अजित पवार यांच्या बारामतीशी असलेल्या नात्याचा उल्लेख करत, “दादांची जागा कोणीही भरून काढू शकणार नाही. दादा दादा होते,” अशी भावना व्यक्त केली.

बारामतीबाबत सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमांमधून निनावी पत्रे येत असल्याचा उल्लेख करत युगेंद्र पवार यांनी पत्र लिहिणाऱ्यांना आपले नाव जाहीर करण्याचे आवाहन केले. “निनावी पत्र लिहिण्यापेक्षा खाली आपले नाव लिहा. तुमच्याशी चर्चा करून अडचणी समजून घेता येतील,” असे ते म्हणाले.

सध्या सत्तेत नसतानाही बारामतीकरांसाठी वेळ देत असल्याचे सांगत ते म्हणाले, “आठवड्यातील पाच दिवस मी बारामतीत असतो. सत्ता नसली तरी बारामतीसाठी जे काही करता येईल, ते करण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

‘गुन्हेगारांमध्ये दादांचा दरारा होता’

बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त करत युगेंद्र पवार यांनी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी केली. “दादांचा एक दरारा होता. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घाबरायचे. आता तो वचक राहिलेला नाही. हा वचक पुन्हा निर्माण झाला पाहिजे. प्रशासनाला ताकद देऊन कठोर निर्णय घेण्याची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले.

विकासकामांच्या नियमित पाहणीचा सल्ला

अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचा दाखला देत त्यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांना विकासकामांचा नियमित आढावा घेण्याचा सल्ला दिला. “दादा पहाटे सहा वाजता विकासकामांची पाहणी करायचे. कामात थोडी जरी गडबड दिसली तर ठेकेदाराकडून ते काम पुन्हा करून घेत असत. बारामतीतील अनेक इमारती आणि विकासकामे ही दादांची पॅशन आणि ज्ञानामुळे उभी राहिली,” असे ते म्हणाले.

सत्ता मिळाल्यास विकासकामांचा नियमित आढावा घेऊन त्यांचा पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘भाजपसोबत जाणार नाही असे मला वाटते’

विरोधक म्हणजे शत्रू नव्हेत, अशी भूमिका मांडताना युगेंद्र पवार यांनी वैचारिक मतभेद असले तरी राजकीय मैत्री जपता येते, असे सांगितले. देशात पुन्हा वैचारिक लढाईचे राजकारण रुजले पाहिजे आणि त्याची जबाबदारी नव्या पिढीने स्वीकारली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. “भाजपसोबत जाणार नाही, असे मला वाटते,” असेही त्यांनी म्हटले.

‘भ्रष्टाचार खपवून घेणार नाही’

बारामती नगरपालिकेतील विविध प्रश्नांवर सक्षम विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन शहरातील प्रश्न मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“कोणी भ्रष्टाचार करत असेल तर आम्ही तो खपवून घेणार नाही. बारामतीमध्ये हे चालू देणार नाही. सक्षम विरोधी पक्ष म्हणून बारामतीकरांसाठी लढत राहू,” असा इशारा युगेंद्र पवार यांनी दिला.

‘गेली पन्नास वर्षे बारामतीकरांनी साथ दिली’

बारामतीतील नेतृत्वाच्या प्रश्नावर बोलताना युगेंद्र पवार यांनी भावनिक भूमिका मांडली. “दादांची जागा कोणीही भरून काढू शकणार नाही. दादा दादा होते. आम्ही बारामतीच्या सेवेसाठी आहोत. गेली पन्नास वर्षे बारामतीकरांनी आम्हाला साथ दिली आहे. हा आशीर्वाद वाया जाऊ देणार नाही,” असे सांगत त्यांनी बारामतीकरांसाठी काम करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Back to top button