स्थानिक

खोरवडीतील खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; बारामती न्यायालयाचा निकाल

न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला

खोरवडीतील खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; बारामती न्यायालयाचा निकाल

न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला

बारामती वार्तापत्र 

दौंड तालुक्यातील खोरवडी येथे जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या जपान्या किसन चव्हाण यांच्या खूनप्रकरणी दोन्ही आरोपींना बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गोरख आबा काळे आणि अक्षय गोरख काळे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास तीन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.

१५ जानेवारी २०२१ रोजी खोरवडी येथे जपान्या किसन चव्हाण यांना ‘खोरवडीला राहू नकोस, भिगवण येथील सासरवाडीला जाऊन राहा,’ असे सांगत आरोपींनी मारहाण केली होती. त्यांना उचलून आपटण्यासह डोक्यात मारहाण करून त्यांचा खून केल्याचा आरोप होता. यापूर्वीही खोरवडी गावात येऊ नकोस, असे सांगत मयताला वेळोवेळी मारहाण केली जात असल्याचे तपासात समोर आले होते.

या प्रकरणी मयताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४२/२०२१ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी १४ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी बालसाक्षीदार, वैद्यकीय अधिकारी तसेच तपासी अधिकाऱ्यांच्या साक्षी आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवले.

न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत दोन्ही आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिन्यांचा साधा कारावास अशी अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली.

या खटल्यात विशेष सरकारी वकील अॅड. ज्ञानदेव शिंगाडे यांना अॅड. योगेश लालबिगे यांनी सहकार्य केले.

Back to top button