बारामतीत रुग्णवाहिका भाडेदर निश्चित; २५ किमी/२ तासांसाठी ७०० ते २,५०० रुपयांपर्यंत दर
निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या वाहनमालक व चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार

बारामतीत रुग्णवाहिका भाडेदर निश्चित; २५ किमी/२ तासांसाठी ७०० ते २,५०० रुपयांपर्यंत दर
निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या वाहनमालक व चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार.
बारामती वार्तापत्र
बारामती कार्यक्षेत्रातील रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. रुग्णवाहिकेत रुग्ण बसल्यापासून परतीच्या अंतरासाठी हे भाडेदर लागू राहणार आहेत. निश्चित केलेल्या दरपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणाऱ्या वाहनचालक व मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी कळविले आहे.
सुधारित दरपत्रकानुसार विविध प्रकारच्या रुग्णवाहिकांसाठी २५ किलोमीटर अथवा दोन तासांसाठी निश्चित दर, त्यापुढील प्रत्येक किलोमीटरचे भाडे, प्रतीक्षा शुल्क तसेच प्रतिदिन किंवा ३०० किलोमीटरचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
अवातानुकूलित मारुती व्हॅनसाठी २५ किमी अथवा दोन तासांसाठी ७०० रुपये, त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १६ रुपये आणि प्रतीक्षा तासासाठी १२५ रुपये आकारता येतील. प्रतिदिन किंवा ३०० किमीपर्यंतचा दर ४ हजार रुपये राहणार आहे.
अवातानुकूलित मारुती ईको व टाटा मॅजिकसाठी २५ किमी अथवा दोन तासांसाठी ९०० रुपये, त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १७ रुपये आणि प्रतीक्षा तासासाठी १२५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. प्रतिदिन किंवा ३०० किमीचा दर ४ हजार ५०० रुपये आहे.
अवातानुकूलित महिंद्रा बोलेरो व फोर्स क्रुझरसाठी २५ किमी अथवा दोन तासांसाठी १ हजार २०० रुपये, त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १८ रुपये आणि प्रतीक्षा तासासाठी १५० रुपये आकारण्यात येतील. प्रतिदिन किंवा ३०० किमीचा दर ५ हजार रुपये आहे.
अवातानुकूलित फोर्स टेम्पो ट्रॅव्हलरसाठी २५ किमी अथवा दोन तासांसाठी १ हजार ५०० रुपये, त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २२ रुपये आणि प्रतीक्षा तासासाठी १७५ रुपये दर राहणार आहे. प्रतिदिन किंवा ३०० किमीचा दर ७ हजार रुपये निश्चित करण्यात आला आहे.
तर वातानुकूलित फोर्स टेम्पो ट्रॅव्हलर (आयसीयू) साठी २५ किमी अथवा दोन तासांसाठी २ हजार ५०० रुपये, त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी ३० रुपये आणि प्रतीक्षा तासासाठी २५९ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. प्रतिदिन किंवा ३०० किमीचा दर १० हजार रुपये राहणार आहे.
तसेच इंधन, देखभाल-दुरुस्ती व चालकाचा खर्च वगळून प्रतिदिनचे दर वाहनप्रकारानुसार १ हजार ते ४ हजार रुपये निश्चित करण्यात आले आहेत.
जादा भाडे आकारल्यास मोठा दंड
निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या वाहनमालक व चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्या गुन्ह्यास ५ हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्या व त्यापुढील प्रत्येक गुन्ह्यास २० हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी स्पष्ट केले आहे.
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून जादा भाडे आकारले जाणार नाही, तसेच निश्चित केलेल्या दरपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याची जबाबदारी संबंधित रुग्णवाहिका चालक व मालकांची राहणार आहे.






