बारामतीत शेतीचा नवा प्रयोग! AIचा वापर अन् ३ किलोचा ‘शरद मॅंगो’; शरद पवारांनी घेतली पाहणी
‘शरद मॅंगो’ अन् AI तंत्रज्ञानाचा संगम!

बारामतीत शेतीचा नवा प्रयोग! AIचा वापर अन् ३ किलोचा ‘शरद मॅंगो’; शरद पवारांनी घेतली पाहणी
‘शरद मॅंगो’ अन् AI तंत्रज्ञानाचा संगम!
बारामती वार्तापत्र
बारामती येथील गोविंद बाग येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘शरद मॅंगो’ या विशिष्ट वाणाच्या आंब्याच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात आलेल्या ऊस पिकाचीही शरद पवार यांनी पाहणी केली.
‘शरद मॅंगो’ हे वाण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण येथील शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी विकसित केले आहे. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या एका फळाचे वजन साधारण तीन किलोपर्यंत असल्याचे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांच्या प्रयोगशीलतेतून आणि मेहनतीतून नव्या वाणांची निर्मिती होत असून, अशा प्रयोगांना प्रोत्साहन मिळणे शेती क्षेत्रासाठी महत्त्वाचे ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर गोविंद बागेत ‘शरद मॅंगो’ची लागवड करण्यात आली.
दरम्यान, AI तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्यात आलेल्या ऊस पिकाची शरद पवार यांनी पाहणी केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीची उत्पादनक्षमता वाढविणे, पिकांचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे आणि बदलत्या काळानुसार शेतीमध्ये नवे प्रयोग करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
नवीन वाणांना प्रोत्साहन देण्यासोबतच आधुनिक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित शेतीवर भर देण्याची भूमिका या प्रयोगातून अधोरेखित होत आहे. गोविंद बागेत सुरू असलेले हे प्रयोग शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादनक्षमता वाढविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.






