बारामतीत शरद पवारांचा सरकारवर घणाघात; ‘महागाईच्या मूळ प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी इश्यू निर्माण केले जात आहेत!’
रुपया घसरला तर थेट खिशावर परिणाम

बारामतीत शरद पवारांचा सरकारवर घणाघात; ‘महागाईच्या मूळ प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी इश्यू निर्माण केले जात आहेत!’
रुपया घसरला तर थेट खिशावर परिणाम.
बारामती वार्तापत्र
राज्यासह देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर अडचणी निर्माण झाल्या असून महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. कुटुंबप्रमुखांना दैनंदिन गरजा पूर्ण करणेही अवघड होत असताना, मूळ प्रश्नांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी विविध मुद्दे पुढे आणले जात असल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली.
शरद पवार म्हणाले, “महागाई वाढली आहे. लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे कुटुंबप्रमुखांना अवघड होत आहे. मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी शिक्षणासह इतर विषयांवर चर्चा घडवून आणली जात आहे.हे ठरवून होत आहे असे आम्हाला दिसत आहे.”
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही भाष्य.
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत पवार यांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याची संधी दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने स्वीकारलेल्या धोरणावर न्यायव्यवस्थेनेही भूमिका स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीवर सावध भूमिका.
शिवसेना चिन्ह वाटपाच्या सुनावणीबाबत बोलताना पवार यांनी, “शेवटी कोर्टाचा निकाल आहे. अजून सुनावणी सुरू आहे. प्रकरण संपलेले नाही. आठ-दहा दिवस वाट पाहू आणि त्यानंतर चर्चा करू,” अशी सावध भूमिका घेतली.
GDPच्या आकडेवारीवरून सरकारवर टीका.
देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र अतिशय सुंदर असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप पवार यांनी केला. मात्र, अर्थव्यवस्थेतील मूळ अडचणींकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे त्यांनी म्हटले.
रुपयाच्या घसरणीचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर होऊन आगामी काळात महागाईच्या झळा आणखी बसू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
पंतप्रधान मोदींच्या बारामती दौऱ्याबाबत मोठी माहिती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येणार असल्याचे सांगत पवार म्हणाले की, १६ ऑक्टोबरची तारीख देण्यात आली असून त्यात पुढे-मागे होण्याची शक्यता आहे.
बारामतीत उभारण्यात आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स संस्थेची पाहणी पंतप्रधान मोदी करणार असून त्यांना संस्थेचे सविस्तर प्रेझेंटेशन देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
साखरेच्या दरवाढीचा फायदा ऊस उत्पादकांना मिळायला हवा
साखरेचे दर वाढत असले तरी त्याचा फायदा अद्याप ऊस उत्पादकांना झालेला दिसत नसल्याचे पवार यांनी म्हटले. उत्पादन खर्च वाढत असताना वाढलेल्या दरातील काही हिस्सा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
साखर आयात करण्याच्या निर्णयालाही पवार यांनी विरोध दर्शविला.
पावसाच्या दडीने दुष्काळाचे संकट; मराठवाड्याबाबत चिंता
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीसह पाणीटंचाईचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पवार यांनी सांगितले. “सबंध मराठवाडा दुष्काळाने होरपळून निघेल असे चित्र दिसत आहे. हे चांगले चित्र नाही,” असे ते म्हणाले.
संकटात सापडलेल्या नागरिकांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दूध भेसळ कारवाईचे पवारांकडून समर्थन
तुकाराम मुंढे यांच्या दूध भेसळीविरोधातील कारवाईचे समर्थन करताना पवार म्हणाले की, या कारवाईमुळे दुधातील भेसळ थांबली आहे. भेसळमुक्त दूध मिळत असल्याने ग्राहक अधिक पैसे देण्यास तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत ‘बघूया’ची भूमिका
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही मंत्री आज सकाळी तिथे जाणार असल्याचे सांगत “ते काय निर्णय सांगतात ते बघूया,” अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली.
विखे पाटलांच्या टीकेला पवारांचे प्रत्युत्तर
आपल्यावर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना पवार यांनी, “१९९४ पासून आजपर्यंत काय करताय? आजपर्यंत तुम्ही सत्तेमध्येच आहात,” असा सवाल केला.






