आपला जिल्हा

बारामती एमआयडीसीत आरोग्याचा महामेळावा! ४०० हून अधिक उद्योजकांची विविध तपासण्या

उद्योगाच्या प्रगतीसोबत उद्योजकांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे

बारामती एमआयडीसीत आरोग्याचा महामेळावा! ४०० हून अधिक उद्योजकांची विविध तपासण्या

उद्योगाच्या प्रगतीसोबत उद्योजकांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे

बारामती वार्तापत्र 

उद्योगाची वाढ करताना आरोग्याकडे दुर्लक्ष नको, या उद्देशाने बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन आणि विश्वराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष आरोग्य तपासणी शिबिरास बारामती एमआयडीसी व परिसरातील उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ४०० हून अधिक उद्योजकांची विविध महत्त्वपूर्ण आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.

बारामती शहर व एमआयडीसी परिसरातील कंपन्यांच्या जवळच्या अंतरावर तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असलेल्या विश्वराज हॉस्पिटलच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. उद्योग-व्यवसायाच्या धावपळीत अनेकदा उद्योजक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. ही बाब लक्षात घेऊन उद्योजकांना त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून घेण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

या शिबिरामध्ये लिपिड प्रोफाइल, एचबीए१सी, सीरम क्रिएटिनिन, सीबीसी, रँडम ब्लड शुगर, आरएफटी (रिनल फंक्शन टेस्ट), एलएफटी (लिव्हर फंक्शन टेस्ट), दंतचिकित्सा, डोळ्यांची तपासणी आणि ईसीजी अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. तपासण्यांनंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उद्योजकांना वैयक्तिक आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी विजय पेटकर, कार्यकारी अभियंता; यशवंत नलवडे, मुख्य अग्निशमन अधिकारी; धनंजय जामदार, अध्यक्ष, बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन; विश्वराज हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर डॉ. आशिषकुमार दोशी; कॉर्पोरेट मार्केटिंग मॅनेजर मनमित राजवाडे तसेच विविध कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना हनुमंत पाटील यांनी उद्योग व्यवसायाची वाढ करताना उद्योजकांनी प्रथम स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. वेळप्रसंगी आजारपण उद्भवल्यास विश्वराज हॉस्पिटलच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

धनंजय जामदार म्हणाले की, उद्योजक व्यवसायाच्या धावपळीत अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. उद्योजकांची आरोग्यविषयक स्थिती समजून घेण्यासाठी विश्वराज हॉस्पिटलच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

तपासणीदरम्यान काही आरोग्यविषयक समस्या आढळल्यास त्यावर वेळीच उपचार सुरू करण्यास मदत होऊ शकते. बारामतीपासून तुलनेने जवळ असलेल्या विश्वराज हॉस्पिटलमधील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा उद्योजक व कंपन्यांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

विश्वराज हॉस्पिटलचे डॉ. आशिषकुमार दोशी यांनी प्रास्ताविकात विश्वराज हॉस्पिटलच्या कार्याची माहिती दिली. एमआयटीचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून तसेच डॉ. राहुल कराड आणि डॉ. आदिती कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलचे कामकाज सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. व्यावसायिक दृष्टिकोनापेक्षा सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा करण्यावर भर असल्याचे नमूद करत बारामती एमआयडीसीतील कंपन्या व उद्योजकांनी हॉस्पिटलच्या विविध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, खजिनदार अंबिरशाह शेख वकील, कार्यकारणी सदस्य महादेव गायकवाड, संभाजी माने, मनोज पोतेकर, खंडूजी गायकवाड, हरिश्चंद्र खाडे, विष्णू दाभाडे आणि हरीश कुंभारकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य संभाजी माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

उद्योगाच्या प्रगतीसोबत उद्योजकांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Back to top button