मोठी बातमी! बँक कर्मचाऱ्यांचा ३ दिवसांचा संप पुढे ढकलला; २८ ते ३० सप्टेंबरचा संप तूर्तास स्थगित
पाच दिवसांच्या बँकिंग आठवड्याच्या मागणीवर तोडगा?

मोठी बातमी! बँक कर्मचाऱ्यांचा ३ दिवसांचा संप पुढे ढकलला; २८ ते ३० सप्टेंबरचा संप तूर्तास स्थगित
पाच दिवसांच्या बँकिंग आठवड्याच्या मागणीवर तोडगा?
बारामती वार्तापत्र
बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान पुकारण्यात आलेला देशव्यापी तीन दिवसांचा बँक संप पुढे ढकलण्यात आला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्यात २७ सप्टेंबर रोजी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे ताज्या वृत्तांमध्ये समोर आले आहे.
या संपामागे बँकिंग क्षेत्रात पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणी हा प्रमुख मुद्दा होता. UFBUने यापूर्वी २८, २९ आणि ३० सप्टेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली होती.
संप झाला असता तर शाखांमधील रोख जमा-वितरण, धनादेशाशी संबंधित कामकाज, खातेविषयक सेवा आणि अन्य प्रत्यक्ष बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र ATM, UPI, इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगसारख्या डिजिटल सेवा सुरू राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
दरम्यान, सरकारने २७ सप्टेंबर रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहकांच्या सोयीसाठी सुरू ठेवण्याची व्यवस्था केली होती.
आता संप पुढे ढकलल्यामुळे बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, पुढील चर्चेत पाच दिवसांच्या बँकिंग आठवड्याच्या मागणीवर काय निर्णय होतो, याकडे बँकिंग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.






