सोमेश्वर

सोमेश्वर निवडणुकीत नवा ट्विस्ट! “जगतापसाहेब, अजूनही वेळ गेलेली नाही!” धंगेकरांचे खुले पत्र; “हट्ट सोडा, अधिकृत पॅनेलसोबत या!”

“अजितदादा हयात असते तर त्यांच्या विचारांच्या विरोधात जाण्याचं धाडस केलं असतं का?”

सोमेश्वर निवडणुकीत नवा ट्विस्ट!
“जगतापसाहेब, अजूनही वेळ गेलेली नाही!” धंगेकरांचे खुले पत्र; “हट्ट सोडा, अधिकृत पॅनेलसोबत या!”

“अजितदादा हयात असते तर त्यांच्या विचारांच्या विरोधात जाण्याचं धाडस केलं असतं का?”

बारामती वार्तापत्र 

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने बारामती तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना आता या संघर्षात शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट उडी घेतली आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांना उद्देशून धंगेकर यांनी खुले पत्र लिहिले असून, जगताप यांच्या निवडणुकीतील भूमिकेवर अनेक थेट सवाल उपस्थित केले आहेत.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केल्याने निवडणुकीचे चित्र तिरंगी झाले आहे. अजित पवार गटाचे अधिकृत पॅनेल, युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल आणि पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र पॅनेल अशी लढत निर्माण झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर धंगेकरांनी जगतापांना लिहिलेल्या पत्रातून त्यांच्या निर्णयावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जगताप यांच्या भूमिकेमुळे ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि सभासदांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

“दादांच्या विश्वासामुळे नेतृत्व मिळाले…”

पत्रात धंगेकरांनी दिवंगत अजित पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्या राजकीय संबंधांचा संदर्भ देत जगतापांना त्यांच्या जुन्या भूमिकेची आठवण करून दिली आहे. अजित पवार यांच्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळे जगतापांना कारखान्याचे नेतृत्व मिळाले, असा उल्लेख करत त्यांनी थेट सवाल केला आहे.

“अजितदादा हयात असते तर त्यांच्या विचारांच्या विरोधात जाण्याचं धाडस केलं असतं का?” असा सवाल धंगेकरांनी उपस्थित केला आहे.

“अजूनही वेळ गेलेली नाही…”

धंगेकरांनी केवळ टीका न करता पुरुषोत्तम जगतापांना भूमिका बदलण्याचे आवाहनही केले आहे. “हट्ट सोडा आणि अजित पवारांच्या अधिकृत पॅनेलसोबत उभे राहा,” असे आवाहन त्यांनी पत्रातून केले आहे.

दरम्यान, पुरुषोत्तम जगताप यांच्या स्वतंत्र पॅनेलमुळे अजित पवार गटासमोर वेगळे राजकीय आव्हान उभे राहिले आहे. ३० सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी जगतापांनी स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली आणि त्यानंतर निवडणुकीचे तिरंगी चित्र स्पष्ट झाले.

शेतकरी-कामगारांच्या प्रश्नांचा दाखला

धंगेकरांनी आपल्या पत्रात सोमेश्वर कारखान्याशी जोडलेल्या शेतकरी, कामगार आणि सभासदांच्या हिताचा मुद्दा उपस्थित केला आहे. निवडणुकीतील राजकीय संघर्षाचा परिणाम कारखान्याच्या सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करणारा ठरू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

त्यामुळे आता पुरुषोत्तम जगताप या खुले पत्राला काय उत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, जगतापांच्या स्वतंत्र पॅनेलमुळे आधीच तिरंगी झालेल्या सोमेश्वरच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार येण्याची शक्यता आहे.

धंगेकरांच्या या पत्रामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीतील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले असून, “जगतापांची पुढची भूमिका काय?” हा प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

Back to top button