अजितदादांच्या नावावरून सोमेश्वरमध्ये आरोप-प्रत्यारोप; सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘कर्तृत्वावर विश्वास असेल तर नाव वापरू नका!’
‘चेअरमन नाव गाजवणारा नव्हे, भाव गाजवणारा असेल!’

अजितदादांच्या नावावरून सोमेश्वरमध्ये आरोप-प्रत्यारोप; सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘कर्तृत्वावर विश्वास असेल तर नाव वापरू नका!’
‘चेअरमन नाव गाजवणारा नव्हे, भाव गाजवणारा असेल!’
सोमेश्वरनगर :प्रतिनिधि
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. ३ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते श्री सोमेश्वर मंदिरात श्रीफळ वाढवून ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनल’च्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पॅनलचे २१ उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
सभेतील उपस्थितीचा उल्लेख करत सुनेत्रा पवार यांनी, “माझा ऊर भरून आला आहे,” अशी भावना व्यक्त केली. दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी आगामी निवडणुकीत शेतकरी आणि सभासदांचा विश्वास कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
‘दादांच्या प्रेमापोटी विजय निश्चित होता; आता त्यांचा वारसा जपायचा’
सुनेत्रा पवार म्हणाल्या, “दादांच्या प्रेमापोटी विजय निश्चित होता. मात्र अजितदादांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत मिळणारा प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा आधार अत्यंत महत्त्वाचा आहे.”
अजित पवार यांच्या निधनानंतर अनेकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांचा संदर्भ देत त्यांनी भावनिक आठवणही सांगितली. “दादा काही झालं की शब्द द्यायचे. आता कोण सोडवणार, असे मला अनेकजण विचारतात. त्यावर माझे उत्तर आहे—मी आहे ना!” असे त्या म्हणाल्या.
‘सोमेश्वर हा शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिलेला घर’
सोमेश्वर कारखाना हा कोणत्याही एका व्यक्तीच्या मालकीचा नसून सभासदांच्या मालकीची संस्था असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
“सोमेश्वर कारखाना हा शेतकऱ्यांच्या घामातून उभं राहिलेलं घर आहे. कारखान्याच्या विकासाचे श्रेय कुणी घेत असेल, तर प्रत्यक्षात ते सभासदांचे श्रेय आहे,” असे त्यांनी सांगितले.
अजित पवार यांचा सोमेश्वर कारखान्याशी असलेला संबंध आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतची त्यांची भूमिका यांचाही त्यांनी उल्लेख केला. कारखान्याच्या विकासासाठी प्रस्ताव, पाठपुरावा आणि विविध स्तरांवरील प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे सांगत अजित पवार यांनी त्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला.
‘दादांनी कारखान्यासाठी आमदारकी पणाला लावली’
अजित पवार यांनी तरुण वयात सहकार क्षेत्रातून आपला प्रवास सुरू केला आणि १९९२ मध्ये सोमेश्वर कारखान्याशी त्यांचे नेतृत्व जोडले गेले, असा उल्लेख सुनेत्रा पवार यांनी केला.
कारखाना अडचणीच्या काळातून जात असताना अजित पवार यांनी कारखान्यासाठी आपली आमदारकी पणाला लावून काम केल्याचा दावाही त्यांनी केला. कारखान्याच्या विस्तारासाठी तसेच विविध प्रकल्पांसाठी प्रस्ताव, पाठपुरावा आणि प्रशासकीय पातळीवरील प्रयत्न करावे लागतात, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता आणि कारखान्याच्या आर्थिक गरजांबाबतही अजित पवार यांनी लक्ष दिल्याचे त्यांनी नमूद केले.
‘स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असेल तर अजितदादांचे नाव वापरू नका’
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या नावाच्या वापरावरून विरोधी भूमिकांवर टीका केली.
“स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असेल तर अजितदादांचे नाव वापरणे बंद करा. दादांच्या नेतृत्वाचा उपयोग करून घेऊ नये आणि त्यांच्या नावावर चुकीच्या गोष्टी खपवून घेऊ नयेत,” असे त्या म्हणाल्या.
या निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांच्या नाव आणि छायाचित्राच्या वापराबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र आदेशही जारी करण्यात आले आहेत.
‘२१ उमेदवारांना विश्वासात घेऊन चेअरमन ठरवणार’
पॅनलच्या भावी नेतृत्वाबाबत सुनेत्रा पवार यांनी महत्त्वाचे विधान केले.
“तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी कुणाला तरी चेअरमन करणार आहे, असे नाही. या २१ उमेदवारांना विश्वासात घेऊन चेअरमन ठरवणार आहे. चेअरमन हा नाव गाजविणारा नसेल, तर भाव गाजविणारा असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
‘सोमेश्वरची सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून ओळख कायम ठेवणार’
शेतकऱ्यांना चांगला ऊसदर मिळावा आणि सोमेश्वर कारखान्याची दराबाबतची ओळख कायम राहावी, यासाठी काम करण्याचा निर्धार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
कारखान्याचे कामकाज, सभासदांचे हित, ऊसदर, आर्थिक व्यवहार आणि भविष्यातील विकास हे मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.
सोमेश्वरमध्ये २१ जागांसाठी तिरंगी लढत
अर्ज माघारीनंतर सोमेश्वर कारखान्याच्या २१ संचालक पदांसाठी तीन प्रमुख पॅनल मैदानात असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुनेत्रा पवार आणि जय पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनल’, युगेंद्र पवार व राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखालील ‘श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल’ आणि पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ अशी निवडणुकीची रचना समोर आली आहे.
छाननीनंतर २१ जागांसाठी ५१४ वैध उमेदवार होते. अर्ज माघारीनंतर पॅनलनिहाय अंतिम चित्र स्पष्ट झाले असून ११ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान आणि १२ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
‘कपबशी’ चिन्हावर मतदानाचे आवाहन
प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी सुनेत्रा पवार यांनी आपल्या पॅनलच्या ‘कपबशी’ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन सभासदांना केले. जास्तीत जास्त सभासदांनी मतदानात सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.






