सोमेश्वर निवडणुकीत अजितदादांच्या फोटोवरून वाद चिघळला; ‘बंदीचा कायदेशीर आधार सांगा’—जगतापांची मागणी
बंदीचा आदेश कोणत्या कलमाखाली?’—लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनलचा थेट सवाल

सोमेश्वर निवडणुकीत अजितदादांच्या फोटोवरून वाद चिघळला; ‘बंदीचा कायदेशीर आधार सांगा’—जगतापांची मागणी
बंदीचा आदेश कोणत्या कलमाखाली?’—लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनलचा थेट सवाल
सोमेश्वर;प्रतिनिधि
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि.च्या पंचवार्षिक निवडणूक २०२६-२०३१ च्या प्रचारात स्व. अजित अनंतराव पवार (अजितदादा पवार) यांचे नाव आणि छायाचित्र वापरण्याबाबत देण्यात आलेल्या निर्देशावरून निवडणुकीचे वातावरण आणखी तापले आहे. ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’चे पॅनल प्रमुख पुरुषोत्तम रामराजे जगताप यांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत या आदेशाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात निवडणूक कार्यालयाच्या २ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्राचा संदर्भ देण्यात आला असून, अजित पवार यांच्या नावाचा अथवा छायाचित्राचा निवडणूक प्रचारात वापर केल्याबाबत आक्षेप अथवा निर्देश देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शासन परिपत्रकाचा दाखला
जगताप यांनी आपल्या निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकाचा दाखला दिला आहे. या परिपत्रकानुसार स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिनांच्या कार्यक्रमात समावेश करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
शासनाच्या निर्देशानुसार २२ जुलै २०२६ रोजी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले होते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याच आधारावर केवळ अजित पवार यांचे नाव किंवा छायाचित्र वापरण्यावर सरसकट आक्षेप घेणे योग्य आहे का, असा प्रश्न पॅनल प्रमुखांनी उपस्थित केला आहे.
‘अजितदादांचा फोटो कोणत्याही पक्षापुरता मर्यादित नाही’
निवेदनात पुढे असा युक्तिवाद करण्यात आला आहे की, शासनाने एखाद्या व्यक्तीच्या जयंतीचा अधिकृत कार्यक्रमात समावेश केला असल्यास त्या व्यक्तीचे नाव आणि छायाचित्र हे केवळ एखाद्या राजकीय पक्षाचे किंवा व्यक्तीचे राहात नाही.
त्यामुळे ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’च्या प्रचार साहित्यावर अजितदादांचे छायाचित्र वापरणे गैर कसे ठरते?, असा सवाल निवेदनातून करण्यात आला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा दाखला
आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ निवेदनात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोस्टर्समध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र वापरले जात असल्याचा दाखला देण्यात आला आहे. या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आक्षेप घेतल्याचेही निवेदनात नमूद आहे.
मात्र या उदाहरणाचा आधार घेत, थोर व्यक्ती अथवा राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे वापरणे हे आपोआप आक्षेपार्ह ठरत नाही, अशी भूमिका पॅनलने मांडली आहे.
‘बंदीचा आदेश नेमक्या कोणत्या कलमाखाली?’
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करताना जगताप यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अधिकारक्षेत्रावरच प्रश्न उपस्थित केला आहे.
‘एखाद्या पॅनलने कोणत्या राष्ट्रपुरुषाचे नाव किंवा छायाचित्र वापरायचे अथवा वापरायचे नाही, याबाबत निर्देश देण्याचा अधिकार निवडणूक अधिकाऱ्यांना कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार आहे?’, अशी विचारणा निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच अजित पवार यांचे नाव अथवा छायाचित्र वापरण्यास प्रतिबंध करणारा आदेश निवडणूक कायद्यातील कोणत्या कलमाखाली किंवा कोणत्या विशिष्ट तरतुदीनुसार काढण्यात आला आहे, याची लेखी माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
आचारसंहितेचा नेमका आधार स्पष्ट करण्याची मागणी
सहकारी संस्थेच्या निवडणुकीस लागू असलेली आचारसंहिता आणि शासनाचे संबंधित परिपत्रक यांचा परस्पर कायदेशीर संदर्भ तपासावा, अशी मागणीही पॅनलने केली आहे.
नाव अथवा छायाचित्र वापरण्यास प्रतिबंध करणारी विशिष्ट तरतूद अस्तित्वात असल्यास तिचा स्पष्ट उल्लेख करून लेखी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
‘निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यास पूर्ण सहकार्य’
दरम्यान, पॅनलने आपल्या निवेदनात निवडणूक प्रक्रियेतील सर्व लागू कायदे, नियम, आचारसंहिता आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे वैध निर्देश यांचे पालन करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि शासनाच्या सर्व लागू नियमांनुसार पार पाडण्यासाठी पूर्ण सहकार्य केले जाईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मात्र अजितदादांचे नाव व छायाचित्र वापरण्याबाबत देण्यात आलेल्या निर्देशाचा शासनाच्या १५ जुलैच्या परिपत्रकाच्या पार्श्वभूमीवर पुनर्विचार करून त्यामागील कायदेशीर आधार स्पष्ट करावा, अशी ठाम मागणी जगताप यांनी केली आहे.
आता निवडणूक अधिकारी या निवेदनावर काय भूमिका घेतात आणि अजितदादांच्या नाव-छायाचित्राच्या वापराबाबत कोणता निर्णय घेतात, याकडे सोमेश्वर कारखाना निवडणुकीतील उमेदवार आणि सभासदांचे लक्ष लागले आहे.






