आपला जिल्हा

बारामती हादरली! ओळखीच्यानेच घात केला? शेरेवाडीतील दोन वृद्ध महिलांच्या हत्येप्रकरणी चुलत नातू ताब्यात

CCTV कमी, पण पोलिसांचा तपास भारी!

बारामती हादरली! ओळखीच्यानेच घात केला? शेरेवाडीतील दोन वृद्ध महिलांच्या हत्येप्रकरणी चुलत नातू ताब्यात

CCTV कमी, पण पोलिसांचा तपास भारी!

बारामती वार्तापत्र 

तालुक्यातील बाबुर्डी परिसरातील शेरेवाडी येथे दोन वृद्ध महिलांची निर्घृण हत्या झाल्याने काही दिवसांपूर्वी परिसर हादरला होता. सुरुवातीला चोरीच्या उद्देशाने बाहेरील व्यक्तीने हा प्रकार केला असावा, असा संशय व्यक्त होत असतानाच पोलिसांच्या तपासाला आता वेगळे वळण मिळाले आहे. मृत महिलांचा चुलत नातू विकास राजेंद्र लडकत (वय २६) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संशयितावर बँक तसेच फायनान्स कंपन्यांचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. कर्जाचे हप्ते थकल्याने निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमुळे पैशांची गरज भागविण्यासाठी चोरीचा प्रयत्न करण्यात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, हत्येचा नेमका उद्देश आणि संपूर्ण घटनाक्रमाचा तपास अद्याप सुरू आहे.

महिलांनी ओळखल्याने हल्ला केल्याचा संशय

शेरेवाडीतील दोन्ही वृद्ध महिला एकत्र राहत असल्याची माहिती संशयिताला होती, अशी बाब प्राथमिक तपासात पुढे आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी घरात प्रवेश केल्यानंतर महिलांनी संशयिताला ओळखल्याने गुन्हा उघडकीस येण्याची भीती निर्माण झाली असावी. त्यातून दोन्ही महिलांवर हल्ला करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे.

दोन्ही महिला झोपेत असताना त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. या हल्ल्यात दोघींचा मृत्यू झाला. घटनेनंतर शेरेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

कुऱ्हाड आणि रक्ताळलेले कपडे विहिरीत?

हत्येनंतर गुन्ह्यात वापरण्यात आलेली कुऱ्हाड तसेच रक्ताचे डाग असलेले कपडे जवळील विहिरीत फेकण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. या वस्तूंचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे. संबंधित वस्तू हस्तगत झाल्यास तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पोलिसांनी संशयिताकडून चोरीच्या काही सोन्याच्या वस्तू हस्तगत केल्याची माहिती समोर आली आहे. या मुद्देमालाचा या गुन्ह्याशी नेमका संबंध काय, याचाही तपास केला जात आहे.

CCTV मर्यादित; तरीही पोलिस पोहोचले संशयितापर्यंत

घटनास्थळाच्या परिसरात CCTV कॅमेऱ्यांची उपलब्धता मर्यादित असल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते. मात्र, स्थानिक माहिती, गुप्त बातमीदारांचे नेटवर्क आणि तांत्रिक तपास यांच्या आधारे पोलिसांनी संशयिताच्या हालचालींचा मागोवा घेतला.

संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असून, हत्याकांडाशी संबंधित महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

सुपे पोलिसांच्या पथकाची महत्त्वाची भूमिका

या दुहेरी हत्याकांडाच्या तपासात सुपे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस शिपाई किसन ताडगे, महादेव साळुंखे, भाऊसाहेब चौधरी आणि पीयूष माळी यांनी तपासात सहभाग घेतल्याची माहिती आहे.

मर्यादित CCTV, सुरुवातीला ठोस पुराव्यांचा अभाव आणि गुन्ह्याबाबत विविध शक्यता असतानाही पोलिसांनी तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे संशयितापर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.

पाच दिवसांची पोलीस कोठडी; अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणार

संशयित विकास लडकत याला न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने पुढील तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती आहे.

या कालावधीत पोलिसांकडून हत्येमागील नेमका उद्देश, चोरीचा मुद्देमाल, गुन्ह्याचे नियोजन, हत्येसाठी वापरलेले हत्यार आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जाणार आहे.

दरम्यान, या दुहेरी हत्याकांडामुळे बारामती तालुक्यासह पुणे ग्रामीण पोलिस दलातही खळबळ उडाली होती. तपासातील अधिकृत बाबी स्पष्ट करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार असून, त्यानंतर हत्याकांडाचा नेमका घटनाक्रम आणि तपासातील अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Back to top button