क्राईम रिपोर्ट

तमाशाचा नाद… कर्जाचा भार… सोन्याची लालसा! शेरेवाडीत चोरीचा डाव ठरला रक्तरंजित; दोन महिलांचा बळी

आठ तपास पथकं, २०० हून अधिक गुन्हेगारांची झाडाझडती

तमाशाचा नाद… कर्जाचा भार… सोन्याची लालसा! शेरेवाडीत चोरीचा डाव ठरला रक्तरंजित; दोन महिलांचा बळी

आठ तपास पथकं, २०० हून अधिक गुन्हेगारांची झाडाझडती

बारामती वार्तापत्र 

तमाशाचा नाद, डोक्यावर कर्जाचा भार आणि सोन्याची लालसा… या सगळ्यांची परिणती बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे दोन महिलांच्या दुहेरी हत्याकांडात झाल्याचा धक्कादायक तपास पोलिसांनी समोर आणला आहे. चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केल्यानंतर दोन महिलांवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी शेरेवाडीतील विकास ऊर्फ अप्पा राजेंद्र लडकत (वय २५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेत इंदुमती मारुती लडकत आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत या दोन महिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंगावरील सुमारे पाच तोळे, अंदाजे सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आठ तपास पथकं मैदानात

दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्रकरणाच्या तपासासाठी तब्बल आठ तपास पथकांची नियुक्ती करण्यात आली. घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच दोनशेहून अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती तपासण्यात आली.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचा संशय विकास ऊर्फ अप्पा लडकत याच्यावर केंद्रित झाला.

चौकशीत धक्कादायक माहिती समोर?

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयिताची चौकशी केली असता महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची माहिती समोर आली. या हल्ल्यात कुऱ्हाडीचा वापर झाल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

चोरीला गेलेले सोन्याचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहेत.

सोन्याच्या हव्यासातून रक्तरंजित डाव?

पोलिसांच्या तपासानुसार, तमाशाचा नाद, कर्जाचा भार आणि पैशांची गरज यामुळे सोन्याच्या दागिन्यांवर आरोपीची नजर पडल्याचा प्राथमिक तपास आहे. दागिने चोरण्याच्या उद्देशाने आखलेला डाव पुढे हिंसक झाला आणि दोन महिलांचा जीव गेला, असा पोलिसांचा तपास आहे.

मात्र, या गुन्ह्यामागे नेमका उद्देश काय होता, आरोपीने हा कट पूर्वनियोजित केला होता का आणि त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास अद्याप सुरू आहे.

दोन महिलांचा मृत्यू, परिसरात खळबळ

शेरेवाडीतील या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. दोन महिलांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, या दुहेरी हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम उलगडण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील तपास केला जात असून, या प्रकरणातील सर्व बाजू तपासल्यानंतरच हत्येमागील संपूर्ण कारण स्पष्ट होणार आहे.

Back to top button