सोमेश्वर

‘दादांनंतर आम्ही पोरके झालो; तुम्ही पोरके होऊ नये म्हणून मी जबाबदारी घेतली’ — सुनेत्रा पवार

चोपडजमध्ये शेतकरी सभासदांशी भावनिक संवाद; ‘इथून पुढे काय करायचे, याची जबाबदारी माझी’

‘दादांनंतर आम्ही पोरके झालो; तुम्ही पोरके होऊ नये म्हणून मी जबाबदारी घेतली’ — सुनेत्रा पवार

चोपडजमध्ये शेतकरी सभासदांशी भावनिक संवाद; ‘इथून पुढे काय करायचे, याची जबाबदारी माझी’

बारामती वार्तापत्र 

“प्रत्यक्ष राजकारणाशी माझा दुरान्वयानेही संबंध नव्हता. मात्र दादांनंतर आम्ही पोरके झालो. तुम्ही पोरके होऊ नये, यासाठी मी ही जबाबदारी स्वीकारली,” अशा भावनिक शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी चोपडज येथील शेतकरी सभासद आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात संवाद बैठकांचा सिलसिला सुरू असून, चोपडज येथे झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या कार्याचा आणि बारामतीच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधत स्थानिक प्रश्नही जाणून घेतले.

“दादांनी आपल्या घराकडे कदाचित कमी लक्ष दिले; मात्र लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. प्रत्येक गावात अनेक विकासकामे झाली. एवढे करूनही ‘दादांनी काही केले नाही’ असे बोलले जाते, याचे दुःख वाटते,” अशी खंत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

‘बारामतीत पाणी कोणामुळे आले, याचाही विचार करा’

विकासकामांवर होणाऱ्या टीकेचा संदर्भ देताना त्यांनी बारामतीतील पाणीप्रश्नाचाही उल्लेख केला. “चार जणांनी रानात चार घरे बांधायची आणि तिथे लाईट आली नाही म्हणून दादांच्या नावाने बोंब मारायची, हे योग्य नाही. बारामतीत पाणी कोणामुळे आले, याचाही विचार झाला पाहिजे,” असे त्या म्हणाल्या. हे विधान त्यांच्या बैठकीतील विकासकामांवरील भूमिकेचा भाग होते.

‘इथून पुढे काय करायचे, याची जबाबदारी माझी’

“मागे काय झाले, त्याची मला माहिती नाही. मात्र आता इथून पुढे काय करायचे, याची जबाबदारी माझी आहे. इथून पुढे जे काही लागेल, त्यासाठी मी तुमच्यासोबत उभी राहणार आहे. तुमच्यासाठी कायम उभी राहीन, अगदी दादांसारखी,” असा विश्वास त्यांनी चोपडजमधील ग्रामस्थांना दिला.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याबाबतही भूमिका मांडली. त्यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर सोमेश्वर कारखाना निवडणुकीतील राजकीय घडामोडी आणि अंतर्गत मतभेदही चर्चेत आहेत.

बैठकीदरम्यान शेतकरी सभासद आणि ग्रामस्थांनी विविध स्थानिक प्रश्न सुनेत्रा पवार यांच्यासमोर मांडले. संबंधित प्रश्नांची माहिती घेऊन आवश्यक उपाययोजनांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Back to top button