कृषी

फळबागायतदारांनो, लक्ष द्या!; ९ फळपिकांसाठी विमा संरक्षणाची संधी, अर्जाच्या मुदती जाहीर

द्राक्ष, केळी, मोसंबी, आंबा, डाळिंबसह ९ फळपिकांचा समावेश; पिकानुसार अंतिम मुदती जाहीर

फळबागायतदारांनो, लक्ष द्या!; ९ फळपिकांसाठी विमा संरक्षणाची संधी, अर्जाच्या मुदती जाहीर

द्राक्ष, केळी, मोसंबी, आंबा, डाळिंबसह ९ फळपिकांचा समावेश; पिकानुसार अंतिम मुदती जाहीर

बारामती वार्तापत्र 

हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे फळपिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२६-२७ अंतर्गत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले आहे. या योजनेत द्राक्ष, मोसंबी, केळी, पपई, नारळ, संत्रा, अंजीर, आंबा आणि डाळिंब या नऊ फळपिकांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात ही योजना भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विहित मुदतीत अर्ज करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

📅 फळपिकनिहाय अर्जाच्या अंतिम मुदती

  • द्राक्ष : १५ ऑक्टोबर २०२६
  • केळी, मोसंबी, पपई व नारळ : ३१ ऑक्टोबर २०२६
  • संत्रा व अंजीर : ३० नोव्हेंबर २०२६
  • आंबा : ३१ डिसेंबर २०२६
  • डाळिंब : १४ जानेवारी २०२७

शेतकऱ्यांनी आपल्या फळपिकाची अंतिम मुदत लक्षात घेऊन वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.

योजना कोणासाठी? काय आहेत अटी?

ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. गारपीट या हवामान धोक्यासाठी विमा संरक्षण घेणेही ऐच्छिक असून त्यासाठी अतिरिक्त विमा हप्ता भरावा लागतो. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे आहे की नाही, याबाबतचे घोषणापत्र अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी सादर करणे आवश्यक आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी अधिसूचित फळबागेचे किमान २० गुंठे उत्पादनक्षम क्षेत्र आवश्यक आहे. सर्व फळपिकांचे मिळून कमाल क्षेत्रमर्यादा चार हेक्टर आहे. एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग किंवा आंबिया बहार यांपैकी केवळ एका हंगामासाठी विमा संरक्षण घेता येईल.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

योजनेत सहभाग नोंदवताना पुढील कागदपत्रे व नोंदी आवश्यक आहेत :

१. ॲग्रीस्टॅक नोंदणी अर्थात फार्मर आयडी
२. डिजिटल पीक सर्वेक्षणांतर्गत फळपिकाची नोंद
३. आधार कार्ड
४. बँक खात्याचा तपशील
५. जमीनधारणेचा सातबारा उतारा
६. फळबागेचा जिओटॅगिंग केलेला फोटो
७. भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नोंदणीकृत भाडेकरार

बोगस अर्ज केल्यास पाच वर्षांच्या लाभावर परिणाम

विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी बोगस माहिती देणे किंवा फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित अर्जदारावर कृषी विभागामार्फत कारवाई करण्यात येईल. अशा अर्जदाराला पुढील किमान पाच वर्षे विमा योजनेचा लाभ मिळणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

फळपीक विमा योजनेच्या अटी, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले आहे.

Back to top button