स्थानिक

बारामती जलमय! १५८ मि.मी. पावसाचा जोरदार तडाखा; नगराध्यक्ष सचिन सातव यांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन!

पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करताना विशेष खबरदारी घ्यावी.

बारामती जलमय! १५८ मि.मी. पावसाचा जोरदार तडाखा; नगराध्यक्ष सचिन सातव यांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन!

पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करताना विशेष खबरदारी घ्यावी.

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरात मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रात्रभर जोर धरल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत शहरात तब्बल १५८ मि.मी. पावसाची नोंद झाली. अचानक झालेल्या या जोरदार पावसामुळे शहरातील विविध भागांत पाणी साचले असून, रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहू लागले. अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळे निर्माण झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

बारामतीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल, अशी अपेक्षा नव्हती, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष सचिन सातव यांनी दिली. पावसाच्या तीव्रतेमुळे शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि नागरिकांना सुरक्षित ठेवणे याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना पावसाची माहिती

बारामती शहरात झालेल्या अतिवृष्टीची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना देण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे.

शहरातील ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत, अशा ठिकाणी संबंधित विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काम करत आहेत. पाण्याचा निचरा करण्यासह नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

अधिकारी घटनास्थळी; पोलीस प्रशासनही मदतीसाठी सज्ज

मुसळधार पावसामुळे शहरातील काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून काम करत आहेत.

पोलीस प्रशासनही नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज असून, पावसामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा आणि संभाव्य धोके टाळता यावेत, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.

नागरिकांनो, सतर्क राहा; नगराध्यक्ष सचिन सातव यांचे आवाहन

शहरात झालेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सचिन सातव यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा जोर कमी होईपर्यंत शक्यतो घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे लागल्यास योग्य ती काळजी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करताना विशेष खबरदारी घ्यावी. पावसाच्या पाण्याचा अंदाज न घेता वाहन चालवू नये. प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

बारामतीत अवघ्या काही तासांत झालेल्या १५८ मि.मी. पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असताना, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी सहकार्य करावे आणि स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन नगराध्यक्ष सचिन सातव यांनी केले आहे.

Back to top button