कृषी

ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बारामतीत २२०० मिनिकिटचे उद्दिष्ट

रब्बी हंगामासाठी कृषी विभागाची मोठी योजना; महाडीबीटी पोर्टलवर तातडीने अर्ज करण्याचे सचिन हाके यांचे आवाहन

ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बारामतीत २२०० मिनिकिटचे उद्दिष्ट

रब्बी हंगामासाठी कृषी विभागाची मोठी योजना; महाडीबीटी पोर्टलवर तातडीने अर्ज करण्याचे सचिन हाके यांचे आवाहन

बारामती वार्तापत्र 

रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत पौष्टिक तृणधान्य अभियानांतर्गत तालुक्यातील तब्बल २२०० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर ज्वारीचे मिनिकिट मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेमुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून रब्बी हंगामातील ज्वारी उत्पादन वाढीस चालना मिळणार आहे.

या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना केवळ ज्वारीचे बियाणेच नव्हे, तर पीक उत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेल्या विविध निविष्ठाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मिनिकिटमध्ये सुधारित वाणांचे रब्बी ज्वारीचे बियाणे, बीजप्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य, सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते तसेच कृषी तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळणार आहे.

फुले यशोमती, परभणी सुपर मोती वाणांचे वाटप

या योजनेअंतर्गत फुले यशोमती आणि परभणी सुपर मोती या सुधारित वाणांच्या ज्वारी बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे. दर्जेदार बियाणे, योग्य बीजप्रक्रिया आणि संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून ज्वारीचे उत्पादन वाढविण्यास मदत होणार आहे.

पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व वाढविणे, ज्वारी लागवडीखालील क्षेत्रात वाढ करणे, उत्पादनक्षमता सुधारणे आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

बारामती तालुक्यासाठी २२०० शेतकऱ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले आहे.

रब्बी हंगामात ज्वारी उत्पादन वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सुधारित बियाण्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.

Back to top button