बँकेतच हेरलं, रस्त्यात गाठलं अन् ५० हजार लुटले! वडगाव निंबाळकर पोलिसांचा तपास; आरोपी अटकेत!
नोटा बदलण्याचा बहाणा ठरला महागात!

बँकेतच हेरलं, रस्त्यात गाठलं अन् ५० हजार लुटले! वडगाव निंबाळकर पोलिसांचा तपास; आरोपी अटकेत!
नोटा बदलण्याचा बहाणा ठरला महागात!
बारामती वार्तापत्र
दिवाळीच्या सणासाठी बँकेतून पैसे काढून घरी जाणाऱ्या नागरिकाला नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने गंडा घालत तब्बल ५० हजार रुपये हातचलाखीने लंपास करणाऱ्या आरोपीला वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे. सरफराज मानू इराणी (वय ५०, रा. लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे सोमेश्वरनगर येथील बँक ऑफ बडोदा शाखेत दिवाळीच्या खरेदीसाठी पैसे काढण्यास गेले होते. त्यांनी बँकेतून ५५ हजार रुपये काढले. यावेळी बँकेत पैसे मोजत असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन बसली होती.
बँकेतील व्यवहार पूर्ण करून फिर्यादी पैसे घेऊन दुचाकीवरून घरी जात असताना संबंधित अनोळखी व्यक्ती काळ्या रंगाच्या मोपेडवरून त्यांच्या मागावर आली. काही अंतरावर फिर्यादी यांना थांबवून त्यांच्या खिशातील नोटा खराब असल्याचे सांगितले. त्याऐवजी चांगल्या नोटा बदलून देतो, असा विश्वास संपादन केला.
फिर्यादी यांचा विश्वास बसल्यानंतर आरोपीने त्यांच्याकडील ५० हजार रुपयांची रक्कम हातात घेतली. मात्र, नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत त्याने ५० हजार रुपये घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. दिवाळीच्या खरेदीसाठी काढलेली रक्कम अशा प्रकारे लंपास झाल्याने नागरिकाची फसवणूक झाली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वडगाव निंबाळकर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. अहोरात्र तपास करून पोलिसांनी सरफराज मानू इराणी याला अटक केली. बँकेतून पैसे काढणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे.
या गुन्ह्याचा तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सादिक इनामदार करीत आहेत.
या तपासात पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे, पोलीस हवालदार नितीन तांबे, किरण शेलार, पोलीस शिपाई नरेंद्र यादव, आबा जाधव, निलेश जाधव, सचिन घाडगे, सूरज धोत्रे व विकास येटाळे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
सणासुदीच्या काळात बँकांमध्ये आर्थिक व्यवहारांसाठी गर्दी होत असते. याचाच फायदा घेऊन काही भामटे नागरिकांना लक्ष्य करतात. अनोळखी व्यक्तींकडून नोटा बदलून देणे, नोटा तपासून देणे किंवा अन्य कोणत्याही कारणाने पैसे हातात देण्यास सांगितल्यास नागरिकांनी सावध राहावे. अशा व्यक्तींवर विश्वास न ठेवता आपल्या पैशांची सुरक्षितता जपावी, असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलिसांनी केले आहे.






