विमान अपघातानंतर बारामती ॲग्रो चर्चेत! धुरामुळे व्हिजिबिलिटी घटल्याचा नवनाथ बन यांचा दावा!
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा खळबळजनक दावा; रस्त्याने १७ किलोमीटर, तर हवाई अंतर अवघे ६.३ किलोमीटर! विमानतळाच्या सुरक्षिततेवरून नवे प्रश्न उपस्थित!

बारामती विमान अपघाताच्या चर्चेत रोहित पवारांची बारामती ॲग्रो! कारखान्याच्या धुरामुळे व्हिजिबिलिटी घटल्याचा भाजपचा गंभीर आरोप; ६.३ किलोमीटरच्या हवाई अंतराने खळबळ!
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा खळबळजनक दावा; रस्त्याने १७ किलोमीटर, तर हवाई अंतर अवघे ६.३ किलोमीटर! विमानतळाच्या सुरक्षिततेवरून नवे प्रश्न उपस्थित!
बारामती वार्तापत्र
बारामती विमानतळावरील विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांच्या शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील बारामती ॲग्रो साखर कारखान्याचा धूर चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी कारखान्यातून बाहेर पडणारा धूर बारामती विमानतळापर्यंत पोहोचल्याने व्हिजिबिलिटी अर्थात दृश्यमानता कमी झाली आणि त्याचा विमान अपघाताशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, बारामती ॲग्रो साखर कारखाना आणि बारामती विमानतळ यांच्यातील अंतराची आकडेवारीही आता चर्चेचा विषय ठरत आहे. गुगल मॅप्स नेव्हिगेशननुसार कारखाना ते विमानतळ हे रस्त्याचे अंतर सुमारे १७ किलोमीटर आहे. मात्र, हवाई मार्गाने म्हणजेच एरियल डिस्टन्सनुसार हे अंतर अवघे ६.३ किलोमीटर असल्याचे सांगितले जात आहे.
रस्त्याने १७ किलोमीटर, पण हवेतून अवघे ६.३ किलोमीटर! त्यामुळे कारखान्यातून निघणाऱ्या धुराचा विमानतळाच्या परिसरावर परिणाम झाला होता का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विमान अपघातासारख्या गंभीर घटनेनंतर विमानतळ परिसरातील दृश्यमानता, हवामान आणि आसपासच्या औद्योगिक प्रकल्पांमधून होणारे उत्सर्जन या बाबींची तपासणी होणे महत्त्वाचे आहे. मात्र, कारखान्याचा धूरच अपघाताला कारणीभूत ठरला, हे अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेले नाही. त्यासाठी अपघाताच्या वेळची वाऱ्याची दिशा, धुराचे प्रमाण आणि दृश्यमानतेच्या नोंदींची तांत्रिक तपासणी आवश्यक आहे.
नवनाथ बन यांनी केलेल्या या आरोपामुळे आता बारामती ॲग्रो प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. संबंधित यंत्रणा या आरोपांची दखल घेऊन चौकशी करणार का, हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे.
विमान अपघात, कारखान्याचा धूर आणि ६.३ किलोमीटरचे हवाई अंतर! बारामतीच्या विमानतळ सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, या आरोपांमागचे सत्य अधिकृत चौकशीतूनच स्पष्ट होणार आहे.






