४४ हजार २५५ नागरिकांच्या आयुष्यात प्रकाश! शरद शिर्के यांच्या रुग्णसेवेची विश्वविक्रमाकडे वाटचाल!
दर सोमवार आणि गुरुवारी गरजू रुग्णांना पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याचा उपक्रम!

अंधत्वावर मात करण्यासाठी शरद शिर्के यांची अविरत रुग्णसेवा! ४४ हजार २५५ नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ; सेवाकार्याची विश्वविक्रमाकडे वाटचाल!
दर सोमवार आणि गुरुवारी गरजू रुग्णांना पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याचा उपक्रम!
बारामती वार्तापत्र
आर्थिक परिस्थितीमुळे अनेक गरजू रुग्णांना डोळ्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नाही. त्यामुळे अनेकांना अंधत्वाचा सामना करावा लागतो. मात्र, अशा गरजू आणि गरीब रुग्णांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश निर्माण करण्याचे सामाजिक बांधिलकीचे काम बारामतीतील अष्टविनायक ऑप्टिकल्सचे शरद शिर्के यांनी हाती घेतले आहे. त्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या रुग्णसेवेच्या चळवळीने आता मोठा टप्पा गाठला असून, आजपर्यंत तब्बल ४४ हजार २५५ नागरिकांना या उपक्रमाचा लाभ मिळाल्याची माहिती देण्यात आली.
९ सप्टेंबर २००९ रोजी सुरू झालेला हा सेवाभावी उपक्रम २६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अखंडपणे सुरू आहे. दर सोमवार आणि गुरुवारी गरजू लाभार्थ्यांना पुणे येथील नामांकित भारती हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येते. या माध्यमातून बारामती, इंदापूर, फलटण आणि परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवेचा आधार मिळत आहे.
४४ हजारांहून अधिक नागरिकांच्या जीवनात प्रकाश!
भूमिहीन शेतमजूर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे आणि गरजू रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून जनसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे शरद शिर्के यांनी सामाजिक बांधिलकीतून ही आरोग्यसेवेची चळवळ उभी केली आहे.
केवळ पुण्यातील भारती हॉस्पिटलच नव्हे, तर यापूर्वी पुणे, मिरज आणि सांगली येथील नामांकित रुग्णालयांमध्येही गरजू रुग्णांना दाखल करून त्यांच्या उपचारांची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
शरद शिर्के यांच्या कार्याची विश्वविक्रमाच्या दिशेने वाटचाल!
या उपक्रमाचे कौतुक करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुनीलराव देवकाते पाटील यांनी शरद शिर्के यांच्या रुग्णसेवेचे विशेष कौतुक केले. बारामती, इंदापूर आणि फलटण परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे अंधत्व दूर व्हावे, या उदात्त हेतूने शिर्के यांनी सातत्याने केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
सामान्य परिस्थितीत राहून स्वतःचा वेळ बाजूला काढत हजारो रुग्णांसाठी धडपड करणारे शरद शिर्के यांचे हे काम खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण आहे. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहून त्यांनी केलेल्या या सेवाकार्याची नोंद विश्वविक्रमात होण्यासारखी असल्याची भावना देवकाते पाटील यांनी व्यक्त केली.
रुग्णांना शुभेच्छा देत बसला हिरवा झेंडा!
कार्यक्रमाच्या शेवटी रुग्णमित्र शरद शिर्के यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी प्रमुख पाहुणे सुनीलराव देवकाते पाटील यांच्या शुभहस्ते भारती हॉस्पिटल येथे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या रुग्णांना घेऊन जाणाऱ्या बसचे स्वागत करण्यात आले. तसेच सर्व रुग्णांना यशस्वी शस्त्रक्रियेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
हजारो नागरिकांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश निर्माण करण्याचे काम करणारी ही चळवळ केवळ आरोग्यसेवा नसून माणुसकीचा जिवंत आदर्श ठरत आहे. ४४ हजार २५५ लाभार्थ्यांचा टप्पा गाठणाऱ्या शरद शिर्के यांच्या या सेवाकार्याचे बारामती परिसरातून कौतुक होत आहे.






