एकत्र येणार?दादांची ‘ती’ मागणी अन् शरद पवारांनी झटक्यात केली मान्य
बंद दाराआड अर्धा तास चर्चा

एकत्र येणार?दादांची ‘ती’ मागणी अन् शरद पवारांनी झटक्यात केली मान्य
बंद दाराआड अर्धा तास चर्चा
पुणे :प्रतिनिधि
पुण्यात आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
यावेळी अजितदादांनी शरद पवार यांच्याकडे एक मागणी केली. ती शरद पवार यांनी लगेच मान्य केली.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून बक्षिसाची रक्कम दहा हजार दिली जाते. ती वाढवून एक लाख रूपये करावी, अशी मागणी अजितदादांनी केली. त्यावर संस्थेकडून दिले जाणारे बक्षिसाची रक्कम दहा हजार होती. आजपासून त्याची रक्कम वाढवून एक लाख रूपये केली जाईल, असं शरद पवार यांनी म्हटलं.
अजितदादा काय बोलले?
“उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिसाची रक्कम दहा हजार रुपये दिली जाते. आज दहा हजारला फारशी किंमत उरलेली नाही. त्यामुळे ती रक्कम एक लाख रुपये करण्याची मी विनंती करतो. अर्थात वाढ कधी करायची याचा निर्णय शरद पवार घेतील,” असं अजितदादा म्हणाले.
यानंतर बोलताना शरद पवारांनी म्हटलं, “आतापर्यंत वैयक्तिक कामगिरीबद्दल संस्थेकडून पुरस्कारासाठी बक्षीस म्हणून 10 हजारांची रक्कम दिली जात होती. आजपासून त्याची रक्कम वाढवून एक लाख रूपये केली जाईल. अंबालिका साखर कारखान्याला देण्यात येणाऱ्या पुरस्काराची रक्कम दोन लाख होती. ती आता पाच लाख रूपये असेल.”
अजितदादांची बैठक व्यवस्था बदलली…
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात शरद पवार आणि अजितदादा पवार यांची बैठकव्यवस्था शेजारी-शेजारी करण्यात आली होती. मात्र, नंतर ती बदलण्यात आली. शरद पवार आणि अजितदादा यांच्यामध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची आसव्यवस्था करण्यात आली. तर, जयंत पाटील अजितदादा हे एकमेकांच्या शेजारी बसले.
पवार कुटुंब एकत्रित रहावे, ही माझी व्यक्तिगत इच्छा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. मात्र, राजकीय भूमिका घेणे माझ्या अधिकारात नाही.
शरद पवार यांच्या कुटुंबीयांपैकी एका लोकप्रतिनिधीचाही सत्तेसोबत जाण्याचा आग्रह सुरू असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. सुप्रिया सुळे यांनीही जाहीरपणे अनुकूलता दाखवली तर सत्तेसोबत जाण्याचा आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्याचा मार्ग सुकर होईल, असे सांगण्यात येते आहे. जर बहुमताने सत्तेसोबत जाण्याचा निर्णय झाला तर शरद पवार संघटनेपासून दूर होण्याचा निर्णयही घेऊ शकतात, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान बच्चू कडू यांनी असे म्हटले आहे की, देशात गत काही दिवसांपासून मोठ्या राजकीय उलथापालथी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. ही चर्चा शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याविषयी आहे. शरद पवार व उद्धव ठाकरे हे लवकरच केंद्रात भाजपसोबत जाताना दिसून येतील. या दोन्ही पक्षांकडे भाजपला आवश्यक असणाऱ्या जागा उपलब्ध आहेत.
संजय राऊत यांच्या विधानातूनही हे अधोरेखित होते. आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्यामुळे कुणीही पक्ष सोडून जाऊ नये हा त्यांचा प्रयत्न आहे.