लग्नाचे आमिष, लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचा आरोप; पोलीस हवालदाराविरुद्ध बारामतीत गुन्हा
सहजीवनादरम्यान फिर्यादी गर्भवती राहिली.

लग्नाचे आमिष, लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचा आरोप; पोलीस हवालदाराविरुद्ध बारामतीत गुन्हा
सहजीवनादरम्यान फिर्यादी गर्भवती राहिली.
बारामती वार्तापत्र
लग्नाचे आमिष दाखवून एका महिला वकिलीची फसवणूक, दीर्घकाळ लैंगिक शोषण, आर्थिक गैरफायदा आणि धमकावल्याप्रकरणी पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी रमेश मोहन जाधव (पोलीस हवालदार) यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९७/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९, ८१, ३५१(२), ३५१(३) व ३१८ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
फिर्यादी महिला व्यवसायाने वकील असून, २०२४ मध्ये न्यायालयीन कामकाजादरम्यान आरोपीशी तिची ओळख झाली. त्यानंतर आरोपीने विवाहाचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, २८ डिसेंबर २०२४ रोजी बारामतीतील एका लॉजमध्ये विवाहाचे आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले.
तक्रारीनुसार, आरोपीने नंतर नातेवाईकांसह फिर्यादीच्या घरी जाऊन विवाहाबाबत चर्चा केली तसेच एका मंदिरात साखळी मंगळसूत्र म्हणून गळ्यात घालत तिला पत्नी असल्याचे सांगितले. काही काळ दोघे सहजीवनात राहत होते.
सहजीवनादरम्यान फिर्यादी गर्भवती राहिली. २० डिसेंबर २०२५ रोजी तिने कन्येला जन्म दिला. मात्र मुलीचा स्वीकार करण्यास आरोपीने नकार दिला, संगोपनासाठी कोणतीही मदत केली नाही तसेच मानसिक त्रास व धमक्या दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
याशिवाय आरोपीने फिर्यादीकडून व तिच्या नातेवाईकांकडून रोख आणि ऑनलाइन स्वरूपात पैसे घेतल्याचा तसेच ते परत न केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात मोबाईल कॉल रेकॉर्ड, व्हॉट्सअॅप चॅट, सीसीटीव्ही फुटेज, लॉजची नोंद, वैद्यकीय कागदपत्रे, बँक व्यवहार आणि इतर डिजिटल व दस्तऐवजीय पुराव्यांची तपासणी करण्यात येणार असून बारामती शहर पोलीस ठाणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
टीप : या प्रकरणातील सर्व आरोप हे फिर्यादीच्या तक्रारीवर आधारित असून त्यांची सत्यता तपासानंतरच निश्चित होणार आहे. कायदेशीर कारणास्तव पीडित महिलेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.







