सरडेवाडीत धावत्या सिमेंट टँकरला भीषण आग; स्थानिकांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
नगरसेवक अजिंक्य जावीर यांनी तत्काळ अग्निशामक उपलब्ध करुन दिल्यामुळे आग आटोक्यात..

सरडेवाडीत धावत्या सिमेंट टँकरला भीषण आग; स्थानिकांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
नगरसेवक अजिंक्य जावीर यांनी तात्काळ अग्निशामक उपलब्ध करून दिल्याने आग आटोक्यात
सरडेवाडी | प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे शनिवारी (दि. १) सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या सिमेंटच्या टँकरला अचानक भीषण आग लागल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे तसेच नगरसेवक अजिंक्य जावीर यांनी तात्काळ अग्निशामक यंत्र उपलब्ध करून दिल्याने आग वेळीच आटोक्यात आली आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सिमेंट टँकर सोलापूरहून पुण्याकडे जात असताना सरडेवाडी परिसरात वाहनातून अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि टँकरचा मोठा भाग आगीच्या विळख्यात सापडला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. ट्रॅक्टरवरील ब्लोअरचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, नगरसेवक अजिंक्य जावीर यांनी तात्काळ अग्निशामक यंत्र उपलब्ध करून दिल्याने आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आले.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत सिमेंट टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून घटनेची चौकशी सुरू असून आग लागण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.
स्थानिक नागरिकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आणि वेळेवर करण्यात आलेल्या मदतकार्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.






